देवगड हापूस आंब्यांची पेटी दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत; ६ डझनाची पेटी पाठवण्याचा प्रकाश शिर्सेकर यांना मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 11:41 IST2025-10-21T11:40:42+5:302025-10-21T11:41:27+5:30
हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे.

देवगड हापूस आंब्यांची पेटी दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत; ६ डझनाची पेटी पाठवण्याचा प्रकाश शिर्सेकर यांना मान
लोकमत न्यूज नेटवर्क, देवगड : देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश शिर्सेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ६ डझन हापूस आंब्यांची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला सोमवारी रवाना केली आहे. या वर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे.
पडवणे गावातील शिर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यात तीन ते चार कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्यातील दोन कलमांवरील मोहराचे त्यांनी प्लास्टिक आवरण घालून संरक्षण केले होते. योग्य काळजी व फवारणीमुळे त्या कलमांवर सुमारे पाच पेट्यांइतकी फळधारणा झाली. त्यापैकी पहिली पेटी त्यांनी २० ऑक्टोबर रोजी वाशी मार्केटकडे रवाना केली.
लक्ष्मीपूजनाला विक्री
वाशी येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनीमार्फत ही हापूस आंबा पेटी पाठविण्यात आली असून, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंब्याची विक्री होणार आहे. लक्ष्मीपूजनाला आंबा विकण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बाजार समितीच्या दलालांनी सांगितले.
पेटीला विक्रमी भाव मिळेल
कोकणातून इतक्या लवकर वाशी मार्केटला हापूस आंब्यांची पेटी रवाना करणारे प्रकाश शिर्सेकर हे पहिलेच बागायतदार ठरले असून, उद्याच्या विक्रीदरम्यान या पेटीला विक्रमी भाव मिळेल, अशी बाजारपेठेत चर्चा आहे.