नमन मंडळे संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:20+5:302021-03-20T04:30:20+5:30

रत्नागिरी : कोरोनामुळे शिमगोत्सवावर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. मात्र, सातत्याने नवनवीन अध्यादेश काढण्यात येत असल्याने नमन मंडळांमध्ये संभ्रमावस्था निर्माण ...

Bow circles in confusion | नमन मंडळे संभ्रमात

नमन मंडळे संभ्रमात

रत्नागिरी : कोरोनामुळे शिमगोत्सवावर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. मात्र, सातत्याने नवनवीन अध्यादेश काढण्यात येत असल्याने नमन मंडळांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शिमगोत्सवात संकासूर, नमन मंडळे गावोगावी फिरतात. पालखी घरोघरी फिरण्यास संमती देण्यात आली असली तरी नमन व खेळे सादर करण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.

गोशाळेसंदर्भात प्रशिक्षण

दापोली : तालुक्यातील टेटवली येथे कामधेनू गोशाळा येथे दोन दिवसाकरिता गोशाळेसंदर्भात विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. शिबीर २० व २१ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी कामधेनू गोशाळेत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी गोशाळा शिबिराचा फायदा होणार आहे.

जिल्हा काँग्रेसची सभा

रत्नागिरी : जिल्हा काँग्रेसची सभा २३ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता काँग्रेस भवन येथे होणार आहे. या सभेत पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात येणार आहे. संघटना वाढीसह, बळकटीकरण व दिशा ठरविण्यात येणार आहे. बैठकीस काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, सर्व ब्लाॅकचे अध्यक्ष प्रदेश प्रतिनिधी आघाडी संघटनांचे जिल्हाध्यक्ष सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वणवामुक्त गाव स्पर्धा

चिपळूण : कोकणात ‘वणवा’ हा गंभर प्रश्न आहे. वणवामुक्त कोकण संघटनेच्या माध्यमातून कोकणातील वणव्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेतंर्गत संघटनेतर्फे वणवामुक्त गाव स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना रोख रकमेची बक्षिसे व चषक देऊन गाैरविले जाणार आहे. तालुक्यातील १६ गावांची निवड करण्यात आली आहे. टेरव, खेर्डी, कळंबस्ते, धामणवणे, कापसाळ, कामथे, कळवंडे, धामणदेवी, पेढे, परशुराम, मिरजोळी, वालोटी, शिरळ, पाचाड, कालुस्ते गावांचा समावेश आहे.

धामणदिवीत क्रिकेट स्पर्धा

खेड : तालुक्यातील धामणदिवी येथील सुबोध सकपाळ मित्रमंडळातर्फे २८ व २९ मार्च या कालावधीत क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत. विजेत्या संघाला १० हजार २१ व उपविजेत्या संघाला ५ हजार २१ रुपयांचे रोख रकमेचे बक्षीस व चषक देऊन गाैरविण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांनाही सन्मानित केले जाणार आहे.

खैरतोडीकडे दुर्लक्ष

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गावात बेकायदा खैरतोड सुरू असून त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. कात निर्मितीसाठी खैराचा वापर केला जात आहे. काताला मागणी असल्याने किमती खैरतोड करून दुर्मीळ असलेली वनसंपदा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासनाचे नियम झुगारून खैरतोड बेकायदा केली जात आहे. याकडे वनविभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आरोग्य तपासणी

रत्नागिरी : येथील मदरसा-तुस-सुफ्फाच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली. मदरशाचे व्यवस्थापक मुफ्ती ताैफिक सारंग यांनी सांगितले की, शरीर हा मानवाला मिळालेला अमूल्य ठेवा आहे. त्याची जपणूक करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या कर्तव्याची विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरातंर्गत विद्यार्थ्यांच्या विविध शारीरिक व मानसिक तपासण्या करण्यात आल्या.

हरिनाम सप्ताह

खेड : तालुक्यातील किंजळे येथील उदय क्रीडा मंडळातर्फे २७ ते ३० मार्चअखेर अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. यानिमित्ताने घटस्थापना, वीण, ध्वजपूजन, कळंबणी येथील गणपत जाधव यांचे कीर्तन, जागर, गाथा पारायण, काल्याचे कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.

पाणीपातळीत घट

खेड : मुसळधार पाऊस पडूनही जलस्त्रोत आटू लागले आहेत. यामुळे ऐन शिमगोत्सवात पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. आंबवली, भिंगारा, चिंचवली, ढेबेवाडी, देवसडेतील वाड्या, खवटी खालची, वरची धनगरवाडी आदी गावांमध्ये फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणाही सतर्क झाली आहे.

परीक्षेची तयारी

रत्नागिरी : शाळांमधून वार्षिक परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. पहिली ते चाैथीपर्यंत परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. पाचवी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू आहेत. दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा असून अन्य वर्गाच्या परीक्षा शाळेतच घेण्यात येणार आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रम संपला असून लेखी परीक्षेची तयारी करून घेण्यात येत आहे.

Web Title: Bow circles in confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.