सिध्दिविनायक ट्रस्टच्या निधीतून बंधाऱ्यांची कामे
By Admin | Updated: March 5, 2016 00:01 IST2016-03-04T22:37:56+5:302016-03-05T00:01:51+5:30
नरेंद्र राणे : जलयुक्त शिवाराला मिळणार बळकटी

सिध्दिविनायक ट्रस्टच्या निधीतून बंधाऱ्यांची कामे
रत्नागिरी :जलयुक्त शिवार अभियानासाठी मुंबई येथील सिध्दिविनायक ट्रस्टने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या १ कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात १४ बंधाऱ्यांची कामे सुरु करण्यात आल्याची माहिती सिध्दिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी दिली़
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान संपूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला. या पार्श्वभूमीवर सिध्दिविनायक ट्रस्टतर्फे प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी याप्रमाणे राज्यातील ३४ जिल्ह्यांना एकूण ३४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. गतवर्षी ट्रस्टतर्फे रत्नागिरी जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला़ दरम्यान, बंधाऱ्यांबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून, या कामांना आता प्रत्यक्षात सुरूवात करण्यात येत असल्याचे राणे यांनी सांगितले़
रत्नागिरी जिल्ह्यात बांधण्यात येत असलेल्या १४ बंधाऱ्यांपैकी ७ सिमेंटचे, तर ७ वळण बंधाऱ्यांचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथे २१ लाख १० हजार रुपये खर्च करून १ सिमेंटचा, तर २ वळण बंधारे बांधण्यात येणार आहेत़ लांजा तालुक्यात विवली येथे १ सिमेंटचा, तर ४ वळण बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी २० लाख ३९ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. खेड तालुक्यातील हेदली येथे २ सिमेंटचे व १ वळण बंधारा बांधण्यात येणार असून, त्यासाठी २७ लाख २६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. खवटी येथे २ सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. दापोली तालुक्यातील लाडघर येथे १२ लाख ८० हजार रुपये खर्च करून सिमेंटचा बंधारा बांधण्यात येणार आहे.
सर्व बंधाऱ्यांच्या कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली असून, या कामांना आता सुरूवात करण्यात येत असल्याचे राणे यांनी सांगितले. या बंधाऱ्यांच्या कामांसाठी १९ लाख रुपये अतिरिक्त निधी ट्रस्टने उपलब्ध करून दिला असल्याचेही राणे म्हणाले़
रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी सिध्दिविनायक ट्रस्टतर्फे १० लाख रुपयांची शैक्षणिक पुस्तके उपलब्ध करून दिल्याचेही राणे यांनी सांगितले. यावेळी सिध्दिविनायक ट्रस्टचे विश्वस्त सतीश पाडावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ए. जी. शहा, सहायक जिल्हा माहिती अधिकारी विजय कोळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
सिध्दिविनायक ट्रस्टतर्फे आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा रूग्णालयाला अर्थसहाय्य करण्यात आले आहे़ जिल्हा रूग्णालयाला ४ डायलेसिस मशीन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी २५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे़ तसेच १ आरओ प्लांट उभारण्यासाठी १२ लाख खर्च करण्यात येणार आहेत़