shiv bhojnalaya : रत्नागिरीत शिवभोजन थाळीत दुसऱ्याच दिवशी बोगस लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 17:25 IST2020-01-27T17:23:22+5:302020-01-27T17:25:37+5:30
दहा रूपयात भरपेट जेवण देणाऱ्या शिवभोजन थाळीच्या उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात बोगस लाभार्थी आढळून आला आहे.

shiv bhojnalaya : रत्नागिरीत शिवभोजन थाळीत दुसऱ्याच दिवशी बोगस लाभार्थी
रत्नागिरी : दहा रूपयात भरपेट जेवण देणाऱ्या शिवभोजन थाळीच्या उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात बोगस लाभार्थी आढळून आला आहे.
शिवभोजन थाळीचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांकडूनच शिवभोजन थाळीचा लाभ घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यां नी दखल घेतली असून, अन्न नागरी पुरवठा खात्याकडून याची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
महाविकास आघाडीने निवडणुकीदरम्यान दहा रूपयात भरपेट जेवण देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर २६ जानेवारी रोजी राज्यातील काही भागांमध्ये शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला.
रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालय, रेल्वे स्टेशन, एस्. टी. स्टॅण्ड आणि हॉटेल मंगला येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, शुभारंभ केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या योजनेत बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. या योजनेचा ठेका वाशी येथील डी. एम. एन्टरप्रायझेस या कंपनीला देण्यात आला आहे.
या ठेकेदाराने नेमलेल्या कामगारांपैकी दोन महिला सोमवारी रांगेत उभ्या राहून कुपन घेत असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता, सुपरवायझरने आपणास रांगेत उभे राहण्यास सांगितल्याचेही सांगितले.
दरम्यान, येथील सुपरवायझरने त्या दोघांची एंट्री रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर या प्रकरणाची दखल जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी घेतली असून, त्यांच्याकडून यादी घेतली जाईल. या यादीमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात शिवभोजन थाळीचा बोगस लाभार्थींनी लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची अन्न नागरी पुरवठा खात्याने दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.