ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गेलेल्या युवतीचा आढळला मृतदेह
By अरुण आडिवरेकर | Updated: March 20, 2024 12:20 IST2024-03-20T12:20:29+5:302024-03-20T12:20:43+5:30
कुवारबाव येथील गणेशनगर- आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वेपुलाजवळील रुळावर मृतदेह आढळला.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गेलेल्या युवतीचा आढळला मृतदेह
अरुण आडिवरेकर, लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मैत्रिणीचा ओबीसीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गेलेल्या युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कुवारबाव येथील गणेशनगर- आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वेपुलाजवळील रुळावर मृतदेह आढळला.
रिया रावसाहेब रणदिवे (१८, रा. रसाळवाडी- शांतीनगर, रत्नागिरी) असे युवतीचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी (१८ मार्च) उघडकीला आला. रिया सायंकाळी घरातून मैत्रिणीचा ओबीसीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जाते असे सांगून गेली होती. रात्री आठ वाजल्यानंतरही ती घरी आली नाही म्हणून नातेवाईकांनी तिच्या मित्र-मैत्रिणींकडे आणि इतरत्र शोधाशोध केली. मात्र, ती सापडली नाही.
त्यानंतर रियाच्या वडिलांनी कुवारबाव पोलिस स्थानकात माहिती दिली. त्यानंतर रियाचे वडील व कुवारबाव पोलिस चौकीतील पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष गायकवाड आणि तटकरी यांनी कुवारबाव परिसरात शोध सुरु केला. शोध सुरु असताना रात्री सव्वा अकराच्या सुमारास तिचा मृतदेह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील रेल्वे पुलाजवळील रेल्वे रुळावर आढळला. मान व धड वेगळे झालेल्या स्थितीत हा मृतदेह पडलेला होता. उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी रियाच्या वडिलांनी शहर पोलिस स्थानकात माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.