आवाशी : खेड तालुक्यातील माणी हद्दीतील शेलारवाडी धरणाच्या पाण्यात मंगळवारी सकाळी तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह प्रसाद प्रदीप आंब्रे (वय २८, रा.माणी, खेड) याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.खेड तालुक्यातील गुणदे गणवाल लवेल माणी हद्दीतील शेलारवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये पाणीसाठा करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी धरणावर नेमण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना धरणाच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी याची माहिती तत्काळ प्रकल्प अधिकारी आणि लवेलचे पोलिस पाटील आशिष धाडवे यांना दिली.याबाबत पोलिस पाटील धाडवे यांनी ही माहिती लोटे पोलिस दूरक्षेत्राला दिली. त्यानंतर, संबंधित अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या मृतदेहाच्या अंगावर लाल रंगाचा टी-शर्ट हाेता, तसेच त्यावर साहिल असे नाव लिहिले हाेते. पाेलिसांनी अधिक तपास केला असता, हा मृतदेह प्रदीप आंब्रे यांच्या मुलाचा असल्याचे स्पष्ट झाले.या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ताे उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत खेड पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.
आत्महत्या की घातपात?प्रसाद हा अविवाहित असून, ताे लाेटे येथे राहत हाेता. त्याच्या आई, वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्याला एक माेठा भाऊ असून, या दाेघांबाबत पाेलिसांच्या हाती अधिक माहिती लागलेली नाही. प्रसाद याने आत्महत्या केली की हा घातपात आहे, याचा शाेध पाेलिस घेत आहेत.