फलक, ट्विटर विषय माझ्यासाठी संपले : उदय सामंत
By मनोज मुळ्ये | Updated: June 17, 2024 19:55 IST2024-06-17T19:54:49+5:302024-06-17T19:55:33+5:30
शनिवारी कणकवली येथे मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांचे छायाचित्र असलेले व अप्रत्यक्षणपणे राणे यांना इशारा देणारा फलक लागला.

फलक, ट्विटर विषय माझ्यासाठी संपले : उदय सामंत
रत्नागिरी : कणकवली येथे शिवसेना कार्यालयाबाहेर फलक लावण्यात आल्याचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या सांगितल्यानंतर लगेचच तो काढून टाकण्याची सूचना मी केली. माझ्यासाठी फलक आणि ट्विटर हा विषय संपला आहे, असे सांगून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सध्या सुरू असलेल्या फलकयुद्धाबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला.
शनिवारी कणकवली येथे मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांचे छायाचित्र असलेले व अप्रत्यक्षणपणे राणे यांना इशारा देणारा फलक लागला. त्यानंतर आमदार नितेश राणे यांचे छायाचित्र असलेला व अप्रत्यक्षपणे सामंत यांना इशारा देणारा फलक लागला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्री उदय सामंत यांच्या गावी म्हणजे पाली येथे खासदार नारायण राणे यांचे छायाचित्र असलेला फलक लागला. सोमवारी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी याविषयावर फारसे भाष्य केले नाही.
गुंतवणुकीवर नाही, फलकांवर चर्चा अधिक
आपण मर्सिडिझ कंपनीची मोठी गुंतवणूक आणली, त्याबद्दल जेवढी चर्चा झाली, त्यापेक्षा कितीतरी अधिक चर्चा फलकांबाबत झाली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पाली येथे ज्यांनी कोणी फलक लावला, त्यामुळे पाली गावाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. जर आपल्याकडे हे फलक आणून दिले गेले असते तर ते आपणही लावले असते, असेही ते उपरोधिकपणे म्हणाले.
...............
महायुतीत सर्व आलबेल
फलकांमुळे महायुतीबाबतही अनेकांना शंका येत आहेत. पण महायुतीत सर्व काही आलबेल आहे. आता छोटा भाऊ आणि मोठा भाऊ हे विषय महाविकास आघाडीत सुरू आहेत. कुठल्याही फलकांमुळे महायुतीत फरक पडणार नाही. ज्याक्षणी आपल्याला आमदार नितेश राणे यांनी कणकवलीतील फलकाबाबत सांगितले, त्याचक्षणी आपण फलक काढून टाकला. आमच्यामध्ये संवाद आहे, याचा हा पुरावा आहे, असेही मंत्री सामंत म्हणाले.