आडिवरे येथे ओम ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:01+5:302021-09-18T04:35:01+5:30
राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओम ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ...

आडिवरे येथे ओम ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर
राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओम ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबिर श्री महाकाली इंग्लिश स्कूलच्या गजानन सभागृहात करण्यात आले होते.
या शिबिराची सुरुवात श्री महाकाली इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक गावीत व कोंडसर बुद्रूक ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती मोगरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गावंडे, उपसरपंच प्रमोद वारिक, ओम ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र भोवड, सचिव बाळ दाते, ग्रामपंचायत सदस्य प्रसन्न दाते व पोलीस पाटील अतिष भोवड उपस्थित होते.
शिबिरावेळी बोलताना ओम ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र भोवड यांनी सांगितले की, आपल्या जीवनात विविध सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासणे महत्त्वाचे आहे आणि आजच्या कोरोनाजन्य परिस्थितीत रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचू शकतील, असे सांगितले. या शिबिराला नाटे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आबासााे पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाचे त्यांनीही कौतुक केले.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ओम ग्रुपचे सदस्य भाई फणसे, अजित दावडे, विकास सावरे, संजय दाते, प्रसन्न दाते, आण्णा तळये, गजानन पोकळे, मंदार पांचाळ, निवृत्ती गोराठे व जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सर्व डॉक्टर व कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरद गोरे यांनी केले.