भाजपचा दावा तिन्ही मतदारसंघांवर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला पुनरुच्चार
By मनोज मुळ्ये | Updated: March 3, 2024 14:24 IST2024-03-03T14:23:51+5:302024-03-03T14:24:03+5:30
सगळे पक्ष संपून भाजपला एकट्यालाच राहायचे आहे का, या शिवसेना नेते रामदास कदम यांच्या टीकेवर कोणतेही उत्तर न देता रत्नागिरी, रायगड आणि मावळ या तीनही मतदारसंघांवर भाजपचा दावा आहे, असे उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.

भाजपचा दावा तिन्ही मतदारसंघांवर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला पुनरुच्चार
रत्नागिरी : सगळे पक्ष संपून भाजपला एकट्यालाच राहायचे आहे का, या शिवसेना नेते रामदास कदम यांच्या टीकेवर कोणतेही उत्तर न देता रत्नागिरी, रायगड आणि मावळ या तीनही मतदारसंघांवर भाजपचा दावा आहे, असे उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.
आपण कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दौरा करत आहोत. कार्यकर्त्यांच्या मनातली भावना मी बोलून दाखवली आहे आणि ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपने तिन्ही मतदारसंघांवर दावा केल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोटे येथील आपल्या सभेपूर्वी भाजपला फटकारले होते. रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघ शिवसेनेचा आहे. भाजपला सगळ्या पक्षांना संपवून एकट्यालाच शिल्लक राहायचे आहे का, असा प्रश्न रामदास कदम यांनी केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली असता मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कोणी काय आरोप केले आहेत यात मी जात नाही. मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आणि भाजपचा प्रचार करण्यासाठी आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, ते मी मांडले आहे आणि ते मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवेन.
भाजपने लोकसभेच्या आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही, या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राची बैठक अजून झालेली नाही. ती झाल्यानंतर दुसरी यादी जाहीर होईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश असेल. अबकी बार ४०० पार असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. मी केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा दौरा केला आहे. कार्यकर्त्यांचा, लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतचा प्रतिसाद पाहता ४०० पार ही गोष्ट अशक्य नाही, हेच लक्षात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सावंत यांनी रत्नागिरीतील कार्यकर्ता मेळाव्याला जाण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बंदी बनवून ठेवण्यात आलेली रत्नागिरीच्या विशेष कारागृहातील खोली पाहिली. याआधी आपण अंदमान येथील कोठडी पाहून तेथे नमन केले आहे. रत्नागिरीच्या कारागृहातील खोली तसेच जिथे सावरकर यांना स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते ती जागाही आपण पाहिली आणि तेथे वंदन केले आहे. अशी ठिकाणे राज्य आणि केंद्र सरकारने विशेष लक्ष देऊन संरक्षित केली पाहिजेत, असे आपल्याला वाटते आणि आपण तसे पत्र पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे माजी आमदार आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सहप्रभारी बाळ माने हेही उपस्थित होते.