भाजपने जिल्हा शिवसेनेला सोडला?,असंतोषाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 03:59 PM2019-10-01T15:59:11+5:302019-10-01T16:01:02+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपची युती सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झालेली नव्हती. मात्र, युती होण्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांना उमेदवारीचे ए. बी. फॉर्म रविवारीच दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा भाजपने शिवसेनेलाच सोडला काय, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

BJP leaves district Shiv Sena ?, atmosphere of discontent | भाजपने जिल्हा शिवसेनेला सोडला?,असंतोषाचे वातावरण

भाजपने जिल्हा शिवसेनेला सोडला?,असंतोषाचे वातावरण

Next
ठळक मुद्दे गुहागरच्या जागेवर हक्क सांगणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीवर पाणीवादग्रस्त जागांमध्ये जिल्ह्यातील एकाही जागेचा समावेश नाही

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपची युती सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झालेली नव्हती. मात्र, युती होण्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांना उमेदवारीचे ए. बी. फॉर्म रविवारीच दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा भाजपने शिवसेनेलाच सोडला काय, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

शिवसेना व भाजपच्या युतीबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. सोमवारी भाजप उमेदवारांच्या अंतिम यादीसाठी नवी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी उशिरापर्यंत बैठक सुरू हाती. त्यावेळी केवळ चार जागांवरून अजूनही सेना व भाजपमध्ये तडजोड होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या चारही वादग्रस्त जागांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही जागेचा समावेश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ भाजपने जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांवर उमेदवारी नको म्हणत तुळशीपत्र ठेवले असून, हा जिल्हाच सेनेला देऊन टाकल्याची चर्चा रंगली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली - खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी - संगमेश्वर, लांजा - राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांची काही वर्षांपूर्वीची युतीमधील वाटणी ही गुहागर, रत्नागिरी मतदारसंघ भाजपला व उर्वरित मतदारसंघ शिवसेनेला अशी होती. मात्र, आता ती स्थिती राहिलेली नाही. २०१४मध्ये राष्ट्रवादीतून सेनेत दाखल होऊन रत्नागिरी मतदारसंघात आमदार उदय सामंत स्थिरावले आहेत. त्यामुळे रत्नागिरीची जागा सेनेला सोडण्याची तयारी भाजपने ठेवलेलीच होती. परंतु गुहागरची जागा मात्र सोडणार नाही, अशी भाजपची प्रथमपासूनची ठाम भूमिका होती. भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड व अन्य नेत्यांनीही ही भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली होती.

मात्र, शिवसेनेने जिल्ह्यातील पाचही जागांवर आपल्या उमेदवारांना ए. बी. फॉर्म दिल्यानंतरही भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजपला सेनेचा निर्णय मान्य आहे, असा अर्थ त्यातून काढला जात आहे. भाजपची मागणी असलेली जिल्ह्यातील गुहागरची जागाही सेनेला देण्यास भाजप नेतृत्त्वाने खरोखर मान्यता दिली आहे का, असा सवालही या निमित्ताने विचारला जात आहे. ह्यसबकुछ शिवसेनाह्ण हे सूत्र जिल्ह्यातील भाजपला मान्य होईल की वादंग सुरू होतील, याचीही चर्चा आहे.

सबकुछ शिवसेना मुळे बंडखोरी होणार?

जिल्ह्यात भाजप विधानसभेच्या एकाही जागेवर लढणार नाही, हे पाहता भाजप जिल्ह्यात अस्तित्वहीन होण्याची भीती जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. तलवार म्यान करूनच राहायचे तर त्याचा पक्षाला काय फायदा, असा सवालही केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते सेनेला मनापासून मदत करतील का, गुहागरमध्ये बंडखोरीची शक्यता आहे का, या चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: BJP leaves district Shiv Sena ?, atmosphere of discontent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.