फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:44+5:302021-05-28T04:23:44+5:30

तन्मय दाते रत्नागिरी : जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, गेल्या दीड वर्षात तब्बल १५८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ...

Beware if money is demanded from Facebook | फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान

फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान

तन्मय दाते

रत्नागिरी : जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, गेल्या दीड वर्षात तब्बल १५८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ‘फेसबुक’वरून फसवलेल्यांच्या ४६ तक्रारी आहेत. ऑनलाईन हाेणाऱ्या फसवणुकीबाबत जनजागृती करूनही अनेकजण या फसवणुकीला बळी पडत आहेत़ त्यामुळे या गुन्ह्यांमध्ये आणखी वाढ हाेत आहे़

सायबर क्षेत्रातील गुन्हेगार विविध योजनांद्वारे आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करतात. ऑनलाईन सेक्सटॉरेशन, फेक अकाऊंट, स्टॉकींग आदी प्रकारांद्वारे फसवणूक केली जाते. फोटो किंवा व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करून ऑनलाईन फसवणूक केली जाते. फेसबुक अकाऊंटच्या प्रोफाईलचा फोटो व नावाचा वापर करून ‘फेक प्रोफाईल’ तयार केले जाते. त्यानंतर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी केली जाते. स्टॉकींगमध्ये फेसबुकच्या आधारे व्यक्तीचा पाठलाग केला जातो. समोरच्या व्यक्तीशी ओळख वाढवून त्याचे फोटो लाईक करणे, वैयक्तिक माहिती मिळवली जाते़ त्यानंतर छुपा पाठलाग केला जातो. हा प्रकार महिलांच्या बाबतीत जास्त होतो.

वाढती सायबर गुन्हेगारी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी जिल्ह्यात सायबर साक्षरता निर्माण व्हावी, याकरिता ‘सायबर एहसास’ हा उपक्रम जिल्हाभर सुरू केला आहे. नागरिकांनी बँक एटीएम कार्डची माहिती देऊ नये, मोबाईलवर येणारे ओटीपी अन्य काेणालाही देऊ नये, फसव्या योजनांना बळी पडू नये, असे आवाहन पाेलिसांकडून करण्यात आले आहे़

-------------

काळजी घेण्यासाठी काय करावे

जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी असाल तेव्हा मोफत इंटरनेट सुविधांचा वापर करून सोशल नेटवर्क साईट कधीही ओपन करू नका. फेसबुकवर येणाऱ्या बातम्यांची लिंक खात्रीलायक असल्याशिवाय ओपन करू नये. फेसबुकवर आपण स्वत:चे किंवा आपल्या नातेवाईकांचे व्यक्तिगत फोटो शेअर करणे टाळावे. अनोळखी व्यक्तीसोबत फेसबुकवर चॅट करणे टाळावे. कोणतेही नवीन अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचा वापर कशाकरिता होणार आहे, याची खात्री करावी. कारण डाऊनलोड केलेले कोणतेही नवीन अ‍ॅप तुमच्या फोनमधील माहितीची चोरी करण्याची शक्यता असते.

-------------------------------

रात्रीच्या वेळी माझे फेसबुक अकाऊंट हॅक केले गेले़ या अकाऊंटवरून पैशांची मागणी केली गेली. माझ्या मित्राने मोबाईलवर संपर्क करत चौकशी करून याबाबत विचारणा केल्यानंतर सारा प्रकार समाेर आला़ त्यानंतर मी माझ्या फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड बदलला़ त्यावेळी अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात आले़

- मनीष सहस्त्रबुध्दे, नागरिक

सायबर क्षेत्रातील गुन्हेगार विविध योजनांद्वारे आमिष दाखवून, नागरिकांशी संपर्क करून त्यांना भुरळ पाडून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. फसव्या याेजनांना नागरिकांनी बळी पडू नये़ नागरिकांनी आपल्या बँक अकाऊंटची माहिती, ओटीपी काेणालाही देऊ नये़ काेणाची फसवणूक झाली तर तत्काळ जवळच्या पाेलीस स्थानकाशी संपर्क साधावा़

- डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक

Web Title: Beware if money is demanded from Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.