शुन्यातून ‘लक्ष’वेधी वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2015 23:15 IST2015-10-29T23:41:23+5:302015-10-30T23:15:09+5:30
श्रमिक स्वयंसहाय्यता बचतगट, गव्हे

शुन्यातून ‘लक्ष’वेधी वाटचाल
बचत गटाच्या कामातून दररोजची मुजरी घेऊन सुद्धा वर्षाला दहा हजार रूपये समान हिस्स्यात घेतले जातात. उर्वरीत नफा बँकेच्या खात्यात बचतीत जमा केले जातात. कुटुंबातील व्यक्तीची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बचत गटाला मदत होत असते. बचत गटाच्या खर्चाने त्यांना स्नेहभोजन व धार्मिक स्थळाची भेट सुद्धा केली जाते. यामध्ये अध्यक्षा रश्मी गोरे, उपाध्यक्षा मयुरी मोर, सचिव अस्मिता मोरे (गुरव), सुविधा गुरव, सुवर्णा आंग्रे, मनिषा मोरे, संध्या गुरव, वर्षा मोरे, पूनम गुरव या महिलांचा समावेश आहे. या सर्व महिलांना एकीचे बळ काय असते हे दाखवून दिले आहे.
एकीच्या बळातून श्रमिक महिला बचत गटाला यश मिळाले आहे. शून्यातून लाखो रूपयाची बचत गटाची उलाढाल झाली आहे. हे केवळ महिलांनी दाखविलेल्या एकोप्यामुळेच शक्य झाले आहे. महिलांनी एकत्र येऊन हा बचत गट स्थापन केला आहे, त्याचा उद्देश केवळ रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्यातून उत्पन्न प्राप्त व्हावे असाच आहे. बचत गटामुळे कष्टकरी महिलांना रोजगार तर मिळालच पण त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
- अस्मिता गुरव, सचिव
महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या हेतूने शासनाने गावागावात महिला बचत गटाची स्थापना केली. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक सक्षम होण्याची संधी मिळाली. परावलंबी जीवन जगणाऱ्या अनेक महिला आता बचत गटामुळे आर्थिक स्वावलंबी बनल्या आहेत. दापोली तालुक्यातील गव्हे तळेवाडी येथील महिलांनी श्रमिक स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून शुन्यातून लाखो रुपयांचे भागभांडवल उभे करुन लघु उद्योगातून सुखी संसाराचे स्वप्न साकारले आहे. केवळ पतीच्या कमाईवर जीवन जगायचे नाही, तर आम्हीसुद्धा स्वाभिमानी जीवन जगू शकतो, हेच यांनी समाजाला दाखवून दिले आहे.
गव्हे येथील कष्टकरी महिलांनी एकत्र येऊन २००६ साली श्रमिक स्वयंसहाय्यता महिला बचत गटाची स्थापना केली. या बचत गटातील बहुतांश महिलांचे शिक्षण कमी आहे. ग्रामीण भागात केवळ रोजंदारीसाठी राबणाऱ्या शेतकरी महिला असल्याने त्यांच्यासाठी बचतगट संकल्पना नवीन होती. परंंतु सर्वच महिला कष्टकरी असल्याने सर्वांनी मिळून काही तरी करून दाखवण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील पुरुष मंडळींनी पाठीवर कौतुकाची थाप मारल्याने महिलांना प्रोत्साहन मिळाले.
बचत गटाच्या सर्व महिलांनी एकत्र येऊन पापड, लोणचे, सरबत बनवण्याचा निर्णय घेतला. कोकणात मुबलक प्रमाणावर मिळणाऱ्या कोकणी मेव्यावर प्रक्रिया करुन कोकम सरबत, आमसूल, आगळ, फणसाचे तळलेले गरे, नाचणी पापड, तांदळाचे पापड, करवंद सरबत बनवायला सुरुवात केली. गव्हे गाव शहरालगत असल्याने बचत गटाच्या वस्तूंना दापोलीत चांगले मार्केट मिळाले. बचत गटातील महिलांनी दाखवलेली एकी फारच उपयोगी पडली. सर्वांनी समान काम समान दाम या तत्त्वावर एकमेकीशी विचारविनिमय करुन मिळून मिसळून काम करायला सुरुवात केली. त्यांच्या मालाला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. चाकरमान्यांचीसुद्धा चांगली मदत होते. मुंबईकर आॅर्डर देतात. श्रमिक स्वयंसहाय्यता बचत गटाच्या मालाला मुंबई बिग बझारमध्ये मोठी मागणी आहे. या ठिकाणीसुद्धा माल पाठवला जातो. परंतु स्थानिक बाजारपेठेतील वाढती मागणी असल्याने सध्या लोकल मार्केटमध्ये मालाचा पुरवठा केला जातो. या बचतगटाची मार्केटिंगची स्वतंत्र यंत्रणा आहे.
श्रमिक स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिला आपला माल मार्केटमध्ये स्वत: घेऊन जातात व गावात डोअर टू डोअर विक्री करतात. त्यामुळे मिळणारा नफा बचत गटाला होतो. भातशेतीची कामे उरकल्यावर बचत गटातील महिला लघुउद्योगाकडे वळतात.
श्रमिक स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी एकीचे बळ दाखवून उन्हाळी भाजीपाला लागवडीचा यशस्वी प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात महिलांनी मोठ्या धाडसाने ३ एकर शेतीत मुळा, माठ, कडवा, पावटा, भोपळा, मिरची, पडवळ, कारली काकडी, कलिंगड लागवड केली. बचत गटातीलच अस्मिता मोहन मोरे (गुरव), संध्या गुरव, मनिशा मोरे या तीन महिलांनी ३ एकर जागा बचत गटाला विनामोबदला देऊ केली. परंतु जमिनीत पाण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. बचत गटाकडे सुरुवातीच्या काळात पुरेसे भाग भांडवल नव्हते. त्यामुळे बचत गटाच्या सर्व महिलांनी श्रमदानातून विहीर खोदण्याचा निर्णय घेतला.
महिलांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करुन कुटुंबातील पुरुष मंडळींनीसुद्धा महिलांना मदत करण्याचे ठरवले. बचत गटातील महिला व त्यांचे पुरुष मिळून श्रमदानातून विहीर खोदण्यात आली. या विहिरीवर मोटर व पंप बसवण्यात आला. विहीर खोदल्यामुळे शेतीला मुबलक पाणी मिळाले. त्या पाण्याच्या जोरावर हिवाळी-उन्हाळी भाजीपाला उत्पन्न महिलांना मिळू लागले. सतत ३ वर्षे भाजी लागवड करून महिलांनी आपण कुठेही कमी नसल्याचे दाखवून दिले. कष्टकरी हाताने भाजीचा मळा फुलवून लाखो रुपयांचे स्वत:चे भागभांडवल निर्माण केले.
बचत गटाच्या महिला आता आर्थिक सक्षम बनल्या असून, कुटुंबातील कामे प्रपंच सांभाळून त्या स्वयंरोजगारसुद्धा करत आहेत. दररोजचा रोजगार (मजुरी) प्रत्येक महिलेला देण्यात येतो. तसेच उर्वरित नफा बचत गटाच्या खात्यामध्ये जमा केला जातो. महिलांनी स्वत:ची मजुरी काढून घेऊन या बचत गटाकडे आता दोन लाख रुपयांचे स्वत:चे भांडवल आहे. दोन लाख रुपये बचत असल्यामुळे या बचत गटाची आर्थिक बाजूसुद्धा मजबूत आहे. १ लाख रुपयांची दीड वर्षाकरिता फिक्स सेव्हिंगसुद्धा या बचत गटाने केली आहे. त्यामुळे बचतीचे चांगलेच महत्त्व या बचत गटातील महिलांना कळले आहे.
- शिवाजी गोरे, दापोली