चिपळूण : इमारतीच्या टेरेसची चावी दिली नाही, याचा राग मनात धरून पाचजणांनी एकत्र येत एकाला बेदम मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पाचजणांवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार, २८ मे रोजी रात्री ११ वाजता चिपळूण शहरातील पाग परिसरात ही घटना घडली.
शहरातील पाग परिसरात कृष्णेश्वर सृष्टी अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी रात्री वरक नावाचा तरुण हा फिर्यादी विशाल विलास महाडिक यांच्याकडे इमारतीच्या टेरेसची चावी मागण्यासाठी आला होता. इतक्या रात्री चावी कशाला हवी, असा प्रश्न करत विशाल यांनी चावी आपल्याकडे नसून, ती दीप्ती देवेंद्र चव्हाण हिच्याकडे आहे, असे सांगितल्याने त्याचा राग वरक याला आला. यावेळी त्याने बाचाबाची करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसेच त्याचे अन्य चार साथीदार बेकायदा जमाव करून आले आणि विशाल महाडिक यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. विशाल यांची पत्नी सोडवायला आली असता, तिलाही मारहाण केली. या मारहाणीत विशाल यांच्या अंगठ्याला दुखापत होऊन ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी संतोष भागोजी खेराडे, शुभम संतोष खेराडे, संकेत संतोष खेराडे, संतोष खेराडे आणि वरक नावाचा तरुण अशा पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.