ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान; हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:40+5:302021-09-15T04:37:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. यामुळे अगदी ऑनलाईन जोडीदार शोधणे हा प्रकारही वाढला ...

ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान; हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. यामुळे अगदी ऑनलाईन जोडीदार शोधणे हा प्रकारही वाढला आहे. डिजिटलच्या या युगात ऑनलाईन जोडीदाराची निवड करण्याचा फंडा सध्या वाढला असला तरी लग्नाआधीच फसवणूक होणार नाही, याची काळजीही नव्या पिढीने घ्यायला हवी.
सध्या अनेक तरुण-तरुणी सोशल मीडियावर कमालीची ॲक्टिव्ह झाली आहेत. त्यामुळे जोडीदार शोधण्यासाठी सोशल मीडियाचाच आधार घेतला जात आहे. त्यातून फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत.
ही घ्या काळजी
- ऑनलाईन लग्न जुळविणाऱ्या संस्थांच्या संकेतस्थळांवर बनावट नाव, पत्ते, फाेटो यासह खोटे प्रोफाईल तयार करून आर्थिक फसवणूक केली जाते. याबाबत खात्री करणे गरजेचे असते.
- अशा संकेतस्थळांवरून खोटी माहिती देऊन लग्नासाठी प्रवृत्त केले जाते. अशा फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी ती व्यक्ती खरी आहे का, ही माहिती घ्यावी.
अशी होऊ शकते फसवणूक
विवाह संस्थांच्या संकेतस्थळांच्या माध्यमातून तरुणींना लग्नाच्या फसव्या बेडीत अडकवण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत.
संकेतस्थळावर नाव व फोटो नकली व्यक्तींचा टाकून बनावट प्रोफाईल तयार केली जाते. बनावट पत्ता तसेच नोकरी असल्याचे भासवूनही तरुणींची फसवणूक केली जाते.
सध्या नवी पिढी सोशल मीडियाचा वापर सातत्याने करीत आहे. सायबर गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे ऑनलाईन जोडीदार निवडतानाही आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय आहे, हे लक्षात घेऊन सर्व प्रकारची वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी. तरच आयुष्याचा जोडीदार निवडताना चूक होणार नाही.
- डाॅ. मोहित कुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी