आजी-आजोबाही देणार १७ मार्चला परीक्षा
By शोभना कांबळे | Updated: March 14, 2024 13:38 IST2024-03-14T13:37:15+5:302024-03-14T13:38:52+5:30
निरक्षरांमध्ये जीवन काैशल्ये विकसित करण्यासाठी शासनाचे प्रयत्न

आजी-आजोबाही देणार १७ मार्चला परीक्षा
रत्नागिरी : केंद्रशासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी येत्या रविवारी १७ मार्च रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात होणार आहे. राज्यात आतापर्यंत सहा लक्ष वीस हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी केंद्रशासनाकडे झाली असून त्या सर्वांची परीक्षा घेण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. दरम्यान ५ लाखाहून अधिक नवसाक्षर ही परीक्षा देतील असा अंदाज आहे.
उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२ ते सन २०२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. देशातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन,लेखन) व संख्याज्ञान विकसीत करून देशातील १५ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींना महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करावयाची आहेत.
या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण, इ. बाबींचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.
जिल्हा नियामक परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत व जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष हे मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) आहेत, शिवाय तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी हे अनुक्रमे तालुका नियामक आणि तालुका कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत. शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समिती/ शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांच्यावर या कार्यक्रमाची जबाबदारी आहे.
या कार्यक्रमात ‘उल्लास’ ॲपवर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार १७ मार्च २०२४ रोजी ऑफलाईन पद्धतीने केंद्रशासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे. केंद्राचे निरीक्षक अवर सचिव प्रदीप हेडाऊ १६ ते १८ मार्च या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारीही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून नेमण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाअंतर्गत ज्या शाळेतून उल्लास ॲपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे, ती प्रत्येक शाळा परीक्षा केंद्र असणार आहे. नोंदणीकृत असाक्षरांनी रविवार दिनांक १७ मार्च रोजी त्या शाळेमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी. तसेच या नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत असे आवाहन शिक्षण संचालनालय (योजना)कडून करण्यात आले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्र/ गुणपत्रक देण्यात येणार आहे.