झाडांचे बारसे उपक्रम आदर्शवत आणि अनुकरणीय : कीर्ती किरण पुजार
By मेहरून नाकाडे | Updated: August 22, 2023 18:46 IST2023-08-22T18:45:28+5:302023-08-22T18:46:24+5:30
रत्नागिरी : पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजल्यास, भविष्यात ती जाणीव विद्यार्थ्यांमध्ये कायम राहत असते यासाठी ...

झाडांचे बारसे उपक्रम आदर्शवत आणि अनुकरणीय : कीर्ती किरण पुजार
रत्नागिरी : पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजल्यास, भविष्यात ती जाणीव विद्यार्थ्यांमध्ये कायम राहत असते यासाठी वाटद कवठेवाडी शाळेचा झाडांचे बारसे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय असून हा उपक्रम सर्वत्र राबविण्यासाठी पुढाकार प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेतर्फे ‘पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धन’ या उद्देशाने आयोजित झाडांचे बारसे या उपक्रमाच्या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक गजानन पाटील, सरपंच सुप्रिया नलावडे, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, जिल्हा विधी व न्याय समिती सदस्य अरुण मोर्ये, व्यापारी गणेश मित्र मंडळाचे उपाध्यक्ष माधव वारे, कोकण मराठी साहित्य परिषद मालगुंड शाखेचे सचिव विलास राणे उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागतानंतर झाडांचे बारसे करण्यात आले. पाळण्यात घातलेल्या बाळाला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नावावरून ‘कीर्ती’ हे नाव देण्यात आले. लगेचच त्या झाडांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी, शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत सर्व ग्रामस्थ, पालकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत जीवनमान उंचावण्याचे आवाहन केले. नियमित नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याबद्दल शाळेचे कौतुक केले.
रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक गजानन पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, वैविध्यपूर्ण उपक्रमातून झाड लावल्यानंतर झाडे वाढविण्यासाठी आणि टिकवण्यासाठी होत असलेले प्रयत्न व त्यातून वृक्षसंर्धनाचे कार्य आदर्शवत असल्याचे सांगून या उपक्रमाच्या प्रसारासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
शाळा जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते वृक्षसंगोपन करण्याच्या स्पर्धेतील विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यासह वाटद ग्रामपंचायतीतर्फे शाळेसाठी बसविण्यात आलेल्या सोलार सिस्टीमचे उद्घाटनही करण्यात आले. उपक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक माधव विश्वनाथ अंकलगे यांनी तर माजी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार यांनी आभारप्रदर्शन केले.