खासगीकरणा विरोधात कणकवलीत बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 17:20 IST2021-12-17T17:19:45+5:302021-12-17T17:20:27+5:30
कणकवली : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्यावतीने राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणा विरोधात काल, गुरुवार व आज, शुक्रवार असा दोन दिवसीय ...

खासगीकरणा विरोधात कणकवलीत बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने
कणकवली : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्यावतीने राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणा विरोधात काल, गुरुवार व आज, शुक्रवार असा दोन दिवसीय संप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कणकवली येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर अधिकारी, कर्मचारी यांनी निदर्शने केली.
यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वेस्टेशन आदी प्रमुख ठिकाणी संपाबाबत माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप केले. तसेच बँक खासगीकरण झाल्यास होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल प्रबोधन केले.
दूरदृष्टी ठेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १४ बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते. मात्र, आता बँकांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. खासगीकरण झाल्यास बँक खाते उघडण्यासाठी ५ ते १० हजार रुपये लागणार आहेत. लहान खातेदारांना कर्ज मिळणे कठिण होईल. सुविधा देण्याच्या नावावर ग्राहकांचे मोठे शोषण होईल. शेतकऱ्यांना कमी व्याजदाराने कर्ज मिळणे बंद होईल आणि सक्तीची कर्जवसूली करून त्यांच्या जमिनी हडपल्या जातील. खासगी बँका फक्त श्रीमंतांनाच चांगली सेवा देतील. म्हणूनच राष्ट्रीयकृत बँका वाचविण्यासाठी युनायटेड फोरमच्या माध्यमातून हा संप करण्यात आला असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे संतोष रानडे, रोहन परब , बँक ऑफ इंडियाचे विजय महाडीक, केतन पालव, संध्या मालवणकर, स्टेट बँकेचे विलास बुचडे, रवि परब, गुरू पावसकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.