अझोलाने दिला शेतकऱ्याला आधार
By Admin | Updated: January 14, 2015 23:35 IST2015-01-14T21:55:30+5:302015-01-14T23:35:50+5:30
दुग्धोत्पादनात वाढ : प्रजनन क्षमताही वाढत असल्याने ठरतेय लाभदायी

अझोलाने दिला शेतकऱ्याला आधार
मेहरुन नाकाडे -रत्नागिरी -दुग्ध उत्पादक जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांना चाऱ्याची समस्या नियमित भेडसावत असते. नागरी वस्तीमध्ये होत असलेल्या वाढीमुळे जनावरांना चरवण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. शिवाय नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असताना, ‘अझोला’ उत्पादन शेतकऱ्यांना पूरक ठरत आहे. दूध देणाऱ्या जनावरांची प्रजनन क्षमता वाढते, शिवाय दुधामध्ये वाढ होत आहे.
‘अझोला’ पर्णवर्णीय पाण्यात वाढणारी वनस्पती आहे. २५ ते ३५ टक्के प्रोटीन, १० ते १५ टक्के खनिजे, अमिनो आम्ल तसेच ७ ते १० टक्के जैव सक्रिय पदार्थ व जैव बहुलक आहे. गाई, म्हशींना दररोजच्या खाद्याबरोबर ‘अझोला’ देण्यात आला असता, दुधामध्ये २५ ते ३० टक्के वाढ झालेली दिसून येते.
‘अझोला’ उत्पादन परसदारात घेण्यात येऊ शकते. एक मीटर रूंद व तीन मीटर लांबीचा खड्डा काढून, त्यामध्ये तितक्याच लांबी रूंदीचे सीलपॉलीन कापड आच्छादले जाते. त्यामध्ये तीन घमेली माती, अर्धा घमेले शेण, तसेच अर्धा किलो गांडूळ खत व सुपर फॉस्पेट घातले जाते. त्यामध्ये पावकिलो अझोला घालण्यात येतो. शिवाय ताजे पाणी घालण्यात येते. या संपूर्ण बेडमध्ये ‘अझोला’ तयार होण्यासाठी ७ दिवस लागतात. अशा प्रकारचे सात बेड तयार केले असता शेतकऱ्यांना दररोज ‘अझोला’ उत्पादन मिळते. जेणेकरून त्याचा उपयोग दुग्ध उत्पादनामध्ये होणारी वाढ व जनावराच्या वाढीव प्रजनन क्षमतेवरून दिसून येतो. ‘अझोला’ हार्बल असल्याने जनावरांना दुग्ध वाढीसाठी गोळ्या किंवा पावडर वापरावी लागत नाही. याचा खर्च वाचतोच, शिवाय जनावरांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत.
‘अझोला’चा वापर कुक्कट खाद्यातही करण्यात येतो. ‘अझोला’मिश्रीत खाद्यामुळे कोंबडीच्या अंडी देण्याच्या क्षमतेतही वाढ होताना दिसते.
आत्मा व कृषी अधिकारी कार्यालयातर्फे कन्याकुमारी येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. चैतन्य शेतकरी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या शेतकऱ्यांनी चार दिवस विवेकानंदपूरम् येथे राहून माहिती घेतली. तामिळनाडू विद्यापीठाचे मि. पिलई व जी. वासुदेवन् यांनी मार्गदर्शन केले. सध्या १२ ते १५ शेतकऱ्यांनी हे उत्पादन सुरू केले आहे. अझोलाचा एक बेड पाच वर्र्षे चालतो.
- प्रसन्न दामले,
शेतकरी, शिरगाव.