कोरोना योद्ध्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:58+5:302021-09-02T05:08:58+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावात अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. कोरोनामुळे कोणाचे नातेवाईक दगावले तर कोणावर अचानकपणे बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ...

कोरोना योद्ध्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
कोरोनाच्या प्रादुर्भावात अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. कोरोनामुळे कोणाचे नातेवाईक दगावले तर कोणावर अचानकपणे बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सर्वच उद्योगधंदे बंद पडल्याने नोकऱ्या राहिलेल्या नाही. नोकरी असेल तर मानधन, वेतन मिळालेले नाही तर काही कर्मचाऱ्यांना अर्धवेतनावर काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत केवळ दोनवेळचे अन्न मिळाले तरी चालेल पण नोकरी टिकली पाहिजे म्हणून काही कामगार, कंत्राटी कर्मचारी नोकरी टिकवण्यासाठी धडपडत आहेत. त्याचा काही ठिकाणी गैरफायदाही घेण्यात आला. काही खासगी कंपन्यांमध्ये दोन-तीन महिन्यांचे मानधनच दिलेले नसल्याची ओरड सुरु आहे. काहींना अर्धमानधनावर समाधान मानावे लागत आहे. महामारी असल्याने आरोग्यसेवेमध्ये अनेक लोकांची आवश्यकता होती. कर्मचारी कमी असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाला आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. अशा परिस्थितीमध्ये कोणीही काम करण्यास तयार नव्हते. मात्र, आरोग्यसेवेचे व्रत घेतलेले असल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी मागे-पुढे न पाहता शासनाच्या आवाहनानंतर कामाची जबाबदारी स्वीकारली. आजपर्यंत कंत्राटी कर्मचारी, कामगारांची ठेकेदारांकडून तसेच शासनाकडूनही थट्टाच झालेली आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन या कर्मचाऱ्यांनी काम न करता ते सुरुच ठेवले आहे.
बेरोजगारी इतकी आहे की एखाद्या ठिकाणी २ जागा भरावयाच्या असल्या तरी हजारो सुशिक्षित बेरोजगार रांगेत उभे असलेले चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे आज नोकऱ्या कमी असून, बेरोजगारी त्यापेक्षा कित्येक पटीने आहे, हे कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळेच काही खासगी कंपन्या, शासनाचे फावले आहे. त्याचा गैरफायदा घेऊन कर्मचारी, कामगारांना राबवायचे काम केले जात आहेत. नोकरी न राहिल्यास खायचं काय, अशी चिंता रोजगार असलेल्यांना तर बेरोजगारांना नोकरी नसल्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे मिळालेली नोकरी टिकवणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जगण्याचे अनेकांचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोना प्रादुर्भावात नोकरी गमावणाऱ्यांची संख्या कमी नाही. ही संख्या वाढतच चालली आहे. बेरोजगारीमुळे काही लोकांनी आपले जीवनही संपवले होते. आज अनेकजण बेरोजगारीमुळे हालाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची फार भीषण परिस्थिती आहे. त्यांची जगण्यासाठी धडपड सुरु आहे. काही सुशिक्षित बेरोजगार नोकरी मिळवण्यासाठी खासगी, सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत आहेत तर लाखो बेरोजगार मिळेल ते काम स्वीकारत आहेत. एकूणच जगण्यासाठी धडपडण्यापलिकडे त्यांच्याकडे काहीही पर्याय राहिलेला नाही. एखाद्याने नवीन व्यवसाय उभा करावयाचा झाल्यास त्यातही अनेक अडचणी उभ्या राहतात.
राज्यातील हजारो कंत्राटी आरोग्यसेवक, डाटा एंट्री ऑपरेटर यांची सेवा अचानक, तडकाफडकी खंडित करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय त्यांच्यावर मोठा आघातच होता. कोरोना कालावधीत आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या आरोग्यसेविकांना अचानक कमी करण्याचे फर्मान केंद्र शासनाकडून सर्वच जिल्ह्यांच्या आराेग्य विभागांना देण्यात आल्याने राज्यातील या कोरोना योद्ध्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तुटपुंज्या वेतनावर मागील १५ वर्षांपासून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कुटुंंब केंद्र शासनाच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे उघड्यावर पडणार आहेत. या कर्मचाऱ्यांनी कोरोना कालावधीत अनेकांचे जीव वाचवले, आज त्यांच्याच जीवाशी शासन मोठा खेळ खेळत आहे, याला काय म्हणावे.