सहाय्यक आयुक्तांकडून कारवाईस टाळाटाळ
By Admin | Updated: October 31, 2015 22:28 IST2015-10-31T22:28:36+5:302015-10-31T22:28:36+5:30
राजिवड्यात मच्छिमारांमध्ये तीव्र असंतोष

सहाय्यक आयुक्तांकडून कारवाईस टाळाटाळ
रत्नागिरी : बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी करुन राजिवडा बंदरात आलेल्या नौकेबाबत माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहाय्यक आयुक्त भादुले यांच्याविरोधात पारंपरिक व छोट्या मच्छिमारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नेट विरोधात मच्छिमारांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयावर मोर्चा काढून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. गेल्या कित्येक महिन्यांपासून पर्ससीन नेट विरोधात मच्छिमारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मोर्चातील मच्छिमारांना सामोरे जाताना भादुले यांनी बेकायदेशीर मच्छीमारी झाल्यास मच्छिमारांनी तत्काळ संपर्क साधल्यास त्या बंदरामध्ये आपले अधिकारी पोहचून कारवाई करतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन केवळ दोन दिवसांतच पोकळ ठरले असल्याची प्रतिक्रिया राजिवडा येथील मच्छिमारांनी दिली.
आज सकाळी राजिवडा बंदरामध्ये एक पर्ससीन नेट नौका मासेमारी करुन बंदरात आल्याचे मच्छिमारांना समजताच त्यांनी भादुले यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. यावेळी मच्छिमारांनी संबंधित नौकेवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, भादुले यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन ही कारवाई करण्यास टाळाटाळ केली. त्यांनी मच्छिमारांना दिलेले आश्वासन पाळले नाही. राजिवडा बंदरामध्ये मत्स्य विभागाचा एकही अधिकारी पाठवला नाही. मत्स्य विभागाकडूनच पारंपरिक मच्छिमारांची गळचेपी सुरु असल्याचे मच्छीमार नेते खलील वस्ता व बशीर फणसोपकर यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)