विमान सेवा महागल्याने हापूस निर्यातीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:26 IST2019-05-07T15:25:29+5:302019-05-07T15:26:41+5:30
रत्नागिरी : यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. परदेशातून आंब्याला मागणी असली तरी पुरेसा आंबा नसल्याने निर्यातीत अडथळा येत ...

विमान सेवा महागल्याने हापूस निर्यातीला अडथळा
रत्नागिरी : यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. परदेशातून आंब्याला मागणी असली तरी पुरेसा आंबा नसल्याने निर्यातीत अडथळा येत आहे. त्याचबरोबर विमान कंपन्यांनी आंबा वाहतूक दरात वाढ केल्यामुळे निर्यात करणे अडचणीचे होत आहे.
कोकणातून बहुतांश हापूस हा विक्रीसाठी मुंबईतील वाशी मार्केटला पाठविण्यात येतो. दररोज सुमारे ६० ते ६५ हजार पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत असून, ६०० ते २५०० रूपये दर पेटीला दिला जात आहे. वाशी मार्केटमध्ये येणाऱ्या आंब्यापैकी ३० टक्के परदेशात निर्यात होत आहे.
हवाईमार्गे आंबा परदेशात निर्यात केला जात आहे. मात्र, यावेळी विमान कंपन्यांनी आंबा वाहतुकीच्या दरात वाढ केल्याने परदेशात आंबा पाठवणे अवघड बनले आहे. परदेशात आंबा निर्यात करताना या कंपन्यांकडून किलोनुसार भाडे आकारले जाते. यापूर्वी युरोपला १०० रूपये किलो दराने भाडे आकारण्यात येत असे. परंतु, यावर्षी त्यात २० रूपयांनी वाढ झाली आहे.
अमेरिकेला आंबा निर्यात करताना १४० रूपये किलो दराने पाठविण्यात येणारा आंबा आता १८० रूपये किलो दराने पाठविण्यात येत आहे. त्यातच जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे आंबा निर्यात अधिक त्रासदायक ठरत आहे.
विमान कंपन्यांकडून दरवर्षी दरात वाढ करण्यात येत आहे. एपीएमसी मार्केटमधील दर कोसळल्यामुळे परदेशी आंबा निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.