महिलांना कायमस्वरुपी रोजगार देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे
By Admin | Updated: December 15, 2015 00:37 IST2015-12-14T23:52:49+5:302015-12-15T00:37:28+5:30
महिलांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी सभापती स्नेहा मेस्त्री यांचे प्रयत्न

महिलांना कायमस्वरुपी रोजगार देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे
महिलांना आरक्षण कशासाठी? त्या काय करणार आहेत? पुरुषाच्या आधाराशिवाय त्या काहीच करु शकणार नाहीत. शेवटी बाई ती बाईच... असे आपल्याकडे कुत्सितपणे बोलले जाते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी... असे म्हटले जाते. महिलांच्या सक्षमतेचे अनेक दाखले इतिहासात आहेत. अनेक महिलांनी स्वकर्तृत्त्वावर आपण पुरुषांपेक्षा सरस आहोत, हे सिध्द केले आहे. परंतु, आपली पुरुषप्रधान संस्कृती हे मानायला तयार नाही. म्हणून महिलांनी स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी सभापती स्नेहा मेस्त्री यांनी चळवळ सुरु केली आहे. आपल्या पदाच्या माध्यमातून महिलांसाठी काय करता येईल, याचा वेध घेण्यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून साधलेला संवाद...
प्रश्न : महिला संघटनांकडे किंवा बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र करण्यासाठी आपण पुढाकार कसा घेतला ?
उत्तर : शहरालगत असलेल्या खेर्डीसारख्या सधन गावात महिलांना अनेक उद्योग, व्यवसाय करता येऊ शकतात. याची आपल्याला जाणीव झाल्यानंतर आपण सहकारी महिलांच्या साथीने महिला बचत गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. माझे पती सुनील मेस्त्री, दीर अनिल मेस्त्री यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावची सेवा केली आहे. त्यामुळे प्रथमपासूनच सामाजिक कार्यात कळत नकळत आमचा सहभाग होताच. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र करण्याची संधी मिळाली. परमपूज्य कलावती आर्इंचे भजन व उपासनेच्या माध्यमातून अनेक महिलांशी जवळीक आली होती. याचाही उपयोग येथे झाला. आम्ही आमच्या गावात ३० बचत गट स्थापन केले.
प्रश्न : बचत गट महासंघाच्या माध्यमातून कोणकोणते व्यवसाय करता ?
उत्तर : ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ३० बचत गट स्थापन झाल्यानंतर या महिलांचा काम करण्याचा उत्साह वाढला. आम्ही फिनेल बनवणे, अगरबत्ती बनवणे, बेकरी पदार्थ बनवणे, काथ्या प्रशिक्षण, मेणबत्ती बनवणे, वॉलपेपर, तोरणे बनवणे असे अनेक लहान मोठे व्यवसाय सुरु केले. त्याला मार्केटही चांगले मिळू लागले. त्यामुळे हे सर्व बचत गट एकत्र करून आम्ही बचत गट महासंघ स्थापन केला. सर्व गट एकमेकांना जोडले गेले. विचारांचे आदान-प्रदान वाढले, संवाद वाढल्याने समन्वय राखला गेला. त्यामुळे ३० गटांच्या ६०० महिला एकत्र येऊन एक चळवळ सुरु झाली. व्यवसायाची गणिते, व्यवहार यावर चर्चा होऊ लागली. नवीन काय करायला हवे, याबाबत महिला बोलत्या झाल्या. यातून महिलांचा फायदाच झाला.
प्रश्न : नारी महोत्सवाची सुरुवात कशी झाली?
उत्तर : बचत गटांनी उत्पादित केलेला माल घरोघरी जात होता. काही दुकानातून विकला जात होता. हा माल तयार करणारे बचत गट लोकांसमोर येत नव्हते. त्यांना एका व्यासपीठाची गरज होती. हे ओळखून आम्ही युगंधराताई राजेशिर्के, पूजा निकम, शेखर निकम, जयंद्रथ खताते, आमची सर्व नेते मंडळी यांच्या सहकार्याने खेर्डी ग्रामपंचायतीजवळ २०१०पासून नारी महोत्सव सुरु केला. त्यामुळे सर्व बचत गटांचा माल विविध स्टॉल्सच्या माध्यमातून समोर दिसू लागला. दोन ते तीन दिवस विविध कार्यक्रम व खरेदी-विक्री येथे होऊ लागल्याने या नारी महोत्सवाचा बोलबाला झाला. राबराब राबणाऱ्या महिलांना सर्वांसमोर माल विकताना व आपल्या मालाच्या दर्जाची स्तुती ऐकताना अंगावर मूठभर मांस आले, त्यांचा उत्साह वाढला. त्यामुळे त्या अधिक गतीने कामाला लागल्या. आजही हा नारी महोत्सव अव्याहतपणे सुरु आहे. त्यातून महिलांना चांगले अर्थार्जन होऊ लागले आहे. बचत गटांना मिळणाऱ्या पैशांचा विनियोगही ते ते गट त्यांच्या पातळीवर करत आहेत.
प्रश्न : कायमस्वरुपी व्यवसाय मिळवण्यासाठी आपली संकल्पना काय आहे?
उत्तर : बचत गटाच्या माध्यमातून महिला आता साठवणूक करु लागली आहे. तिच्या हातात चार पैसे येऊ लागले आहेत. त्याचा कुटुंबाला निश्चितच फायदा होतो. आजच्या महागाईच्या जगात पैशांअभावी महिलांची फारशी कुचंबना होत नाही. त्यांना हवे ते त्या खरेदी करतात किंवा कुटुंबाच्या गरजेच्यावेळी पैसे उभे करतात. महिलांना मिळणारा रोजगार हा हंगामी स्वरुपाचा आहे. त्यांना यातून कायमस्वरुपी रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी आपण खासदार हुसेन दलवाई यांची भेट घेतली आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून महिलांसाठी काही योजना किंवा प्रकल्प करता येतील का? यावर आमचा अभ्यास सुरु आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या बारामतीत असलेल्या महिला उद्योग केंद्राला पूजा निकम व आम्ही काही महिला भेट देणार आहोत. तेथील माहिती घेऊन आपल्या महिलांना त्यातून काही भरीव योगदान देता येईल का, याचाही विचार सुरु केला आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील बचत गटांना अधिक प्रोत्साहन व बळकटी देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शक्य त्या बचत गटांना स्वत: भेटून मार्गदर्शन करण्यात येईल.
प्रश्न : तालुक्याच्या विकासासाठी आपल्या काही योजना?
उत्तर : चिपळूण तालुका हा कोकणातील मध्यवर्ती तालुका आहे. या तालुक्यात सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी वेगाने घडत असतात. त्याचे पडसाद संपूर्ण जिल्हाभर उमटतात. त्यामुळे संवेदनशील असणाऱ्या या तालुक्यात काम करणे तेवढे सोपे नाही. आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपण सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली. कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचा व त्यांच्या कामातील उत्साह वाढवण्यासाठी आपण प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आत्मियता वाढली आहे. कर्मचारी स्थिर असेल तरच तुम्हाला तो योग्य सेवा देऊ शकेल. त्यामुळे प्रथम आपण येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला आहे. चांगले काम करणाऱ्यांना निश्चितच प्रोत्साहन दिले जाईल. पण कामात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या व्यथा आणि समस्या मला माहीत आहेत. वाडीवस्तीवर मी आजही फिरते. लोकांना मूलभूत विकास हवा आहे. याची जाणीव मला आहे. पंचायत समितीत यापूर्वी अनेक कामे पूर्ण झाली असून, त्या ठेकेदारांना बिले मिळालेली नाहीत, हे वास्तव आहे. जुनी देणी देतानाच नवीन कामेही प्रस्तावित व्हायला हवीत, याचा समन्वय साधण्याचा आपला प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे झटपट विकास किंवा विकासात्मक काही गोष्टी घडतील, असे सांगणे धाडसाचे होईल. परंतु, सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सातत्याने पाठपुरावा करुन मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न राहील. आपल्या हातात जे अधिकार आहेत, त्याचा वापर करुन काही सुधारणा घडविण्याचा प्रयत्न करु. यासाठी लोकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. केवळ तक्रारी करुन प्रश्न सुटणार नाहीत तर प्रश्न सोडवण्याची मानसिकता निर्माण करायला हवी. आपण जास्त वेळ लोकांसाठी देऊन आपल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. १०० टक्के लोकांची अपेक्षा आपण पूर्ण करणार नाही, याची जाणीव मला आहे. परंतु, काही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न नक्की करेन, असेही सभापती मेस्त्री यांनी सांगितले.
- सुभाष कदम