उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न
By Admin | Updated: July 29, 2014 22:58 IST2014-07-29T22:16:47+5:302014-07-29T22:58:59+5:30
आर्थिक स्त्रोतासाठी धडपड : मऱ्हा जातीचे वळू अनुदानावर पुरवण्याची योजना

उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न
मेहरून नाकाडे - रत्नागिर, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत दुग्धोत्पादनात वाढ व्हावी, यासाठी विविध उपाययोजना राबवून आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे. संकरित गार्इंचा पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय मुऱ्हा जातीच्या म्हशींच्या पैदासीसाठी मुऱ्हा जातीचे वळू अनुदानावर पुरविण्यात येत आहेत. सुधारित जातीच्या दुधाळ जनावरांच्या पालनातून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक स्त्रोत निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत
आहे.विशेष घटक योजनेंतर्गत २ दुधाळ गाई व म्हशीचा गट ७५ टक्के अनुदानावर पुरविला जातो. अनुदानाची मर्यादा ६३७९६ इतकी आहे. अनुसूचित जातीच्या लाभधारकाकडील दुधाळ जनावरांना भाकड व गाभण काळात १०० टक्के अनुदानाने खाद्याचा पुरवठा विशेष घटक योजनेतून केला जातो. तरूणांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून रोजगार मिळण्यास मदत होत आहे.पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील कामधेनू दत्तक योजनेंतर्गत गावांची निवड करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने योजना राबविल्या जात आहेत. गावातील पशुधनाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी गावातील सर्व जनावरांना लसीकरण करणे, गाई, म्हशींना कृत्रिम रेतन दूध वाढविण्यासाठी क्षारमिश्रण व जीवनसत्व यांचा पुरवठा, प्रत्येक जनावरांना जंतनाशक औषध पाजणे, गोचीड निर्मुलन शिबिर, साथीचे रोग होऊ नयेत, यासाठी लसीकरण करणे, जनावरांच्या वाया जाणाऱ्या मलमुत्रापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येत आहे.
जिल्ह्यात संकरित १४ हजार ६२९ गाई असून, अन्य जातीच्या गाई ३ लाख ८७ हजार ५७१ इतक्या आहेत. एकूण गाई ४ लाख २२ हजार आहेत. तसेच म्हशींची संख्या ४५ हजार ७५ इतकी आहे. एकूण दुधाळ जनावरांची संख्या ४ लाख ४७ हजार २७५ इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात २.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कृत्रिम रेतनापासून उत्कृष्ट जातीच्या नर वासरांमध्ये वाढ झाली आहे. दत्तक गावामध्ये सांघिक भावना वाढीस लागली आहे. कुपोषित व कमी दूध देणाऱ्या जनावरांना कॅल्शियम व ‘अ’ जीवनसत्वयुक्त औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पशुपालन मंडळातील ९००० कायमचे किंवा तात्पुरते वंध्यत्व असलेल्या गाई, म्हशींवर उपचार करण्यात आले आहेत. जननेंद्रियाच्या आजारांवरील औषधोपचारामुळे कृत्रिम रेतनामध्ये १५०० ने वाढ झाली आहे. तरीही हा दुग्धसाठा खूपच कमी आहे.