तपास भरकटवण्याचा प्रयत्न ?
By Admin | Updated: February 25, 2015 00:13 IST2015-02-24T22:06:09+5:302015-02-25T00:13:41+5:30
बोगस दाखले प्रकरण : अद्यापही मुख्य सूत्रधार फरारीच

तपास भरकटवण्याचा प्रयत्न ?
राजापूर : बनावट दाखलेप्रकरणी राजापूर पोलीस अद्यापही मुख्य सूत्रधाराला शोधण्यात अपयशी ठरले असून, या प्रकरणाचा तपास भरकटवला जात असल्याचा आरोप होत आहे.गेले दोन आठवडे राजापूर तालुक्यात बनावट दाखल्यांचा विषय गाजत आहे. मात्र अजूनही या प्रकरणातील तपासाने गती घेतलेली नाही. बनावट दाखले देण्यामागील मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या हाती आलेला नाही.सेतू कार्यालयाचा लोगो असणाऱ्या या दाखल्यावर करण्यात आलेल्या प्रांतांच्या सह्या पूर्वी महा ई सेवा केंद्र नं. ३मधून देण्यात आलेल्या बोगस दाखल्यांवरील सह्यांशी मिळत्याजुळत्या असल्याची बाब खुद्द प्रांतांनीच मान्य केली असून, या सर्व प्रकरणाचा सूत्रधार एकच असल्याचे बोलले जात आहे. सेतू कार्यालयाचे लोगो असलेल्या सुमीत पाटणकर याच्या दाखल्यांसंबधी चौकशी करण्यासाठी सुमीत याच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, त्याने आपल्याला हा दाखला आपल्या शेजारी राहणाऱ्या संतोष शिरवडकर याने दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा गुंता चांगलाच वाढला असल्याचे पुढे येत आहे. (प्रतिनिधी)
वृत्तपत्रांच्या कार्यालयात पाठवले दाखले...
दोन दिवसांपूर्वी सर्व वृत्तपत्रांच्या तालुका कार्यालयात दोन जातीचे दाखले अज्ञाताने पोस्टाने पाठवले असून, त्या दाखल्यांबाबत राजापूर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी त्या दोन्ही दाखल्यांवरील आपल्या सह्या बोगस असल्याची माहिती देताना ती दोन्ही प्रकरणे संबधित व्यक्तींनी सेतू कार्यालयातून परस्पर नेली होती व तशी नोंद हाती रजिस्टरला आहे. तसेच ज्या दोन झेरॉक्स प्रती पोस्टाने पाठवण्यात आल्या आहेत, त्यावर कोणत्याही प्रकारचे सिल मारलेले नाही, अशी माहिती दिली आहे. यांपैकी एका दाखल्यावर सुमीत चंद्रकांत पाटणकर (कणेरी) तर दुसऱ्या दाखल्यावर संदेश शशिकांत गुरव (सोलगाव) अशा नोंदी आहेत.