थकबाकीदारांच्या मालमत्ता होणार जप्त
By Admin | Updated: March 2, 2016 23:58 IST2016-03-02T22:41:33+5:302016-03-02T23:58:10+5:30
रत्नागिरी नगर परिषद : पालिका प्रशासन राबविणार धडक मोहीम

थकबाकीदारांच्या मालमत्ता होणार जप्त
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदने घरफाळा थकबाकीप्रश्नी बजावलेल्या लाल कार्डचा धसका थकबाकीदारांनी घेतला आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात करवसुलीत ७ टक्क्यांनी वाढ झाली असून, यातून ४० लाखांची वसुली झाली आहे. मंगळवारपासून शहरात पालिकेचे जप्ती मोहिमेचे वाहन फिरू लागले असून, थकबाकी न भरल्यास येत्या दोन दिवसात काही मालमत्ता जप्त केल्या जाणार असल्याचे संकेत पालिकेच्या करवसुली विभागाने दिले आहेत. आठवडाभरापूर्वी रत्नागिरी पालिकेने घरफाळा थकबाकी असलेल्या हजारपेक्षा अधिक थकबाकीदारांना पोस्टाने जप्तीच्या नोटीस पाठविल्या होत्या. त्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, अनेक थकबाकीदारांनी पालिकेत येऊन आपला कर जमा केला आहे. त्यामुळेच गेल्या आठवडाभरात सुमारे ४० लाखांचा करभरणा झाला आहे. मात्र, ज्यांनी लाल कार्डनुसार थकबाकी भरलेली नाही, त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई येत्या दोन दिवसात केली जाणार आहे.
करवसुली विभागाचे जप्ती वाहन मंगळवारपासून शहराच्या विविध भागात फिरत असून, ध्वनीक्षेपकाद्वारे जप्ती मोहिमेबाबत थकबाकीदारांना सावध केले जात आहे. दोन दिवसात काही मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्याचे संकेतही सूत्रांनी दिले आहेत. तसेच आणखी हजार थकबाकीदारांना लाल कार्ड बजावली जाणार आहेत. त्यामुळे लाल कार्ड बजावलेल्यांची संख्या दोन हजारवर पोहोचणार आहे.
रत्नागिरी शहरात २४ हजार २८८ करपात्र मालमत्ता आहेत. या मालमत्तांपोटी ६ कोटी ७३ लाख ८३ हजार वार्षिक करमागणी आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी असलेल्या या करमागणी रकमेपैकी ३ कोटी ६ लाख ६७ हजार रुपये अर्थात ४५ टक्के करवसुली गेल्या आठवडाभरापूर्वी झाली होती. त्यानंतर पालिकेने लाल कार्ड बजावल्याने व करवसुली मोहिमेमुळे त्यात ७ टक्क्यांनी वाढ होऊन मंगळवारपर्यंत ही वसुली ५२ टक्क्यांवर पोहोचली आहे. (प्रतिनिधी)
कायदेशीर कारवाई : दहा मालमत्ताधारक अजूनही ढिम्मच
गेल्यावर्षी रत्नागिरी पालिकेने थकबाकीमुळे मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यातील १० मालमत्ताधारकांनी अद्यापही थकबाकी भरलेली नाही. थकबाकी न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही रत्नागिरी नगर परिषदेतील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.