शेती पीककर्जप्रकरणी बँक-सोसायटींचा मनमानी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:29 IST2021-03-24T04:29:09+5:302021-03-24T04:29:09+5:30
पाचल : शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या शेती पीक कर्जावर बँक व विविध कार्यकारी सोसायटी ६ टक्क्यांनी व्याजदर आकारून शेतकऱ्यांची लुटमार ...

शेती पीककर्जप्रकरणी बँक-सोसायटींचा मनमानी कारभार
पाचल : शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या शेती पीक कर्जावर बँक व विविध कार्यकारी सोसायटी ६ टक्क्यांनी व्याजदर आकारून शेतकऱ्यांची लुटमार करीत आहेत. बँक-सोसायटींच्या या मनमानी कारभाराबाबत शेतकऱ्यांमधून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पाचल परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
बँक व विविध कार्यकारी सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने शेती पीककर्ज दिले जाते. मार्चअखेर या कर्जाची परतफेड केली जाते. शून्य टक्के व्याजदराने दिलेले हे कर्ज बँका व विविध कार्यकारी सोसायटी ६ टक्के दराने वसुली करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कर्ज परतफेड करण्यास शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार अथवा हरकतही नाही. मात्र, शून्य टक्के व्याजदर सांगून ६ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसुली केली जात आहे. ही अतिशय गंभीर बाब असून, शेतकऱ्यांची ही घोर फसवणूक असल्याचा स्पष्ट आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ६ टक्के व्याजदराने आकारलेली रक्कम नंतर आपल्या खात्यावर जमा केली जाईल, असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. व्याजाची रक्कम खात्यावर पुन्हा जमा होणार असेल तर व्याज घेताच का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मागील कित्येक वर्षे ६ टक्के व्याजदराने आकारलेली रक्कम आजतागायत कोणत्याच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेली नाही. शून्य टक्के व्याजदराने शेती पीककर्ज सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. या शेती पीककर्जप्रकरणी पाचल परिसरातील शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपली कैफीयत मांडणार आहेत.