पाली बस स्थानकाचे ४९ वर्षांनंतर रूपडे बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:13+5:302021-03-22T04:28:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पाली : चौपदरीकरणाच्या निमित्ताने दोन राष्ट्रीय महामार्ग प्रशस्त होत असतानाच, या महामार्गावरील पाली बस स्थानकही आता ...

पाली बस स्थानकाचे ४९ वर्षांनंतर रूपडे बदलणार
लाेकमत न्यूज नेटवर्क
पाली : चौपदरीकरणाच्या निमित्ताने दोन राष्ट्रीय महामार्ग प्रशस्त होत असतानाच, या महामार्गावरील पाली बस स्थानकही आता कात टाकणार असून, ते येत्या २-३ वर्षांत सुसज्ज होऊन महामार्गाच्या सौंदर्यात भर टाकणार आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार या स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी २ कोटी मंजूर केले असून, त्यासंबंधी स्थानक आणि परिसराची पाहणी केली. याबाबत त्यांनी एसटी प्रशासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन चर्चा केली.
पाली बस स्थानक हे मुंबई-गोवा आणि रत्नागिरी कोल्हापूर या दोन महामार्गांवर मध्यभागी असून, या स्थानकातून दोन्ही मार्गावर दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. हे बस स्थानक १९७२ साली बांधण्यात आले असून, स्थानक जवळजवळ ३७ ते ३८ गुंठ्यात आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गासाठी सद्यस्थितीत ६ ते ७ गुंठे जागा या स्थानकाची गेलेली आहे. स्थानकाच्या दर्शनी भागातील ७ गुंठे जागा आयताकृती पट्टीच्या माध्यमातून गेल्याने स्थानक आता ३० ते ३१ गुंठे जागेत आहे. या बस स्थानकाची दुरुस्ती करण्याची स्थानिक जनतेची आग्रहाची मागणी लक्षात घेऊन, मंत्री उदय सामंत यांनी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम लवकरच सुरू होण्यासाठी जागेची प्रत्यक्ष पाहणी करून इमारत नूतनीकरणा संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
बस स्थानकाच्या पाठी जिल्हा परिषदेची मराठी शाळा असून, तिच्या शांततेला कोणतीही बाधा होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. या शाळेसाठी प्रवेशद्वार ठेवावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
या आढावा बैठकीला रत्नागिरी जिल्हा राज्य परिवहन वाहतूक नियंत्रक सुनील भाेकरे, महामंडळ अभियंता भाटकर, जिल्हा नियोजन अधिकारी मुळये, तहसीलदार शशिकांत जाधव, सरपंच विठ्ठल सावंत, पंचायत समिती उपसभापती उत्तम सावंत, सर्कल सुरेंद्र कांबळे, विभाग प्रमुख तात्या सावंत आणि अभिजीत गोडबोले उपस्थित होते.