‘अंजनवेल’ची पाण्यावाचून तडफड

By Admin | Updated: March 25, 2015 00:45 IST2015-03-24T21:16:12+5:302015-03-25T00:45:59+5:30

‘रत्नागिरी गॅस’ने नाकारले : पंचायत समितीच्या आराखड्यातही समावेश नाही

Anjanvel's water-screwed tumble | ‘अंजनवेल’ची पाण्यावाचून तडफड

‘अंजनवेल’ची पाण्यावाचून तडफड

गुहागर : अंजनवेल ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेच्या विहिरीमध्ये आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाकडून टँकरने होणारा पाणी पुरवठा नाकारण्यात आला आहे व पंचायत समितीच्या टंचाई कृती आराखड्यातही अंजनवेल ग्रामपंचायतीचे नाव नसल्याने पाणी पुरवठा होऊ शकत नसल्याने अंजनवेलवासियांना यावेळी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या विरोधात हंडामोर्चा काढण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
एन्रॉन प्रकल्प म्हणजेच दाभोळ वीज प्रकल्पापासून अंजनवेल गावातील विहिरी दूषित झाल्याने पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागे. ब्राह्मणवाडी येथील ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेच्या एकमेव विहिरीचे पाणी चांगले असल्याने या विहिरीवरुन गावात पाणी पुरवठा केला जातो. एप्रिल व मे महिन्यामध्ये ही विहिरही आटत असून पाणीटंचाई स्थिती निर्माण होते. रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प २००५ पासून सुरु झाल्यानंतर वारंवार ग्रामपंचायतीद्वारे मागणी केल्यानंतर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गतवर्षी दहा टँकरने दररोज पाणी पुरवठा केला जात होता. गतवर्षी दहा टँकरने दररोज पाणी पुरवठा केला जात होता. यावेळी ग्रामपंचायतीकडून कंपनी प्रशासनाला टँकरने पाणी पुरवठ्यासंदर्भात पत्रव्यवहार केल्यानंतर दुर्लक्ष करण्यात आले.
याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांनी रत्नागिरी गॅस कंपनीचे अधिकारी अतुल देसाई, अंजनवेल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेश आंबरे, पंचायत समिती कक्ष अधिकारी दत्तात्रय आंबी यांच्या उपस्थितीत चर्चात्मक बैठक घेतली असता, यावेळी कंपनी प्रशासन पाणी पुरवठा करु शकत नसल्याचे स्पष्ट केले.
याबाबत कंपनी अधिकारी अतुल देसाई यांनी सांगितले की, कंपनीला वाशिष्ठी नदीतून शिरळ पंप हाऊसद्वारे चिपळूण ते गुहागर अशा पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होतो. या पाईपलाईनला अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या पाईप जोडून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याने कंपनीला आवश्यक पाणी पुरवठा सध्या होत नाही. प्रकल्प बंद असला तरी प्रकल्पातील फायर सिस्टीमसाठी दररोजचा आवश्यक पाणी साठा ठेवावा लागतो. प्रकल्पासाठीच जर पाणी पुरत नसेल तर वेगळा पाणीपुरवठा आम्ही करूच शकत नाही, असे स्पष्ट करत प्रथम या कंपनी लाईनवर अनधिकृतपणे राजरोस होणाऱ्या पाणी चोरीवर कारवाई झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
याबाबत ग्रामविकास अधिकारी राजेश आंबरे यांनी सांगितले की, कंपनीला प्रकल्प पूर्ण कार्यान्वित असताना ६ टीएमसी पाणी आवश्यक आहे. सध्या प्रकल्प बंद असल्याने थोडेच पाणी प्रकल्पाला लागते. अंजनवेल ग्रामपंचायतीसाठी पाईपलाईनद्वारे दिलेला टॅप खोलून आवश्यक दररोजचा ३ लाख लिटर पाणी पुरवठा ग्रामपंचायतीला होऊ शकतो असे सुचित केले.
रत्नागिरी गॅस प्रकल्पाकडून दरवर्षी पाणीपुरवठा होत असल्याने पंचायत समितीच्या टंचाई कृती आराखड्यात अंजनवेल गावाचा समावेश नाही. तालुक्यातील ४२ वाड्या टंचाईकृती आराखड्यात आहेत. सध्या एक टँकर उपलब्ध असून, दुसऱ्या टँकरचा ताबा अद्याप मिळालेला नाही. यावर सध्या तरी कोणताच मार्ग नसल्याचे तहसीलदार वैशाली पाटील यांनी स्पष्ट केले. अंजनवेलच्या पाणीटंचाईचे संकट समोर असताना कंपनी प्रशासन व शासकीय यंत्रणेकडून कोणताच मार्ग काढला जात नसल्याने ग्रामस्थांनी हंडा मोर्चा काढण्याची तयारी सुरु केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Anjanvel's water-screwed tumble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.