राजापूर : व्हाॅट्स ॲपवर अश्लील व्हिडीओ बनवून ताे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ओणी-गुरववाडी (ता. राजापूर) येथील एका वृद्धाला साडेपाच लाखाला लुटल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणी राजापूर पाेलिस स्थानकात तिघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रिया शर्मा, विक्रम राठाेड, राहुल शर्मा (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी ओणी-गुरववाडी येथील एका ७० वर्षीय वृद्धाची फसवणूक केली आहे. या तिघांनी व्हाॅट्स ॲपवर एक अश्लील व्हिडीओ बनवून ताे व्हायरल करण्याची धमकी वृद्धाला दिली. हा व्हिडीओ व्हायरल न करण्यासाठी त्यांनी वृद्धाकडे पैशांची मागणी केली.त्यानंतर त्या वृद्धाने बॅंक ऑफ इंडियाच्या ओणी शाखेतून धनादेशाद्वारे ८ मे राेजी ७० हजार, ९ मे राेजी १ लाख, १४ मे राेजी १ लाख, १७ मे राेजी २ लाख आणि २० मे राेजी ८० हजार असे एकूण ५ लाख ५० हजार इतकी रक्कम पाठवून दिली.मात्र, त्यानंतरही धमकीद्वारे पैसे उकळण्याचा प्रकार सुरू हाेता. त्यानंतर त्या वृद्धाने पाेलिस स्थानक गाठून याबाबत साेमवारी फिर्याद दाखल केली. त्यानंतर राजापूर पाेलिसांनी तिघांविराेधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वृद्धाचे लाखो रुपये लुटले, राजापुरातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 14:07 IST