रत्नागिरी : अंगारकी चतुर्थी निमित्त मंगळवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून श्रींचे दर्शन सुरू झाले असून, स्थानिक तसेच परजिल्ह्यातील भाविकांचा महासागरच गणपतीपुळे समुद्रकिनारी लोटला आहे.राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गणपतीपुळेत मोठी गर्दी होते. रात्रीपासूनच गणपतीपुळे येथे दाखल झालेले भाविक मध्यरात्रीपासूनच रांग लावण्यास सुरुवात करतात. अंगारकीनिमित्त येणारे भाविक लक्षात घेऊन गणपतीपुळे देवस्थानकडून पहाटे लवकर पूजा करून साडेतीन वाजल्यापासूनच श्रींच्या दर्शनासाठी मंदिर खुले केले जाते. आजही पहाटेपासून दर्शन सुरू झाले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
नारळबागेत 37 दर्शन रांगा, पार्किंग परिसरात 9 रांगा आणि मंदिर व रेस्ट हाऊसच्या मधल्या भागात 3 रांगा अशा पद्धतीने भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री 10.30 पर्यंत भाविकांना दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.