माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:28+5:302021-03-22T04:28:28+5:30
कब्रस्तानची स्वच्छता रत्नागिरी : शहरातील धनजी नाका येथील कब्रस्तानमध्ये स्वच्छता करण्याची मागणी परिसरातील नागरिक सोहेल लाला यांनी आरोग्य सभापती ...

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
कब्रस्तानची स्वच्छता
रत्नागिरी : शहरातील धनजी नाका येथील कब्रस्तानमध्ये स्वच्छता करण्याची मागणी परिसरातील नागरिक सोहेल लाला यांनी आरोग्य सभापती निमेश नायर यांचेकडे केली होती. तत्काळ निमेश यांनी दखल घेत, नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी पाठवून परिसर स्वच्छ करून घेतला. सभापतींच्या तत्परतेची सोहेल लाला यांनी काैतुक केले आहे.
वेळेत बदल
खेड : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एर्नाकूलम-ओखा फेस्टिव्हल स्पेशल गाडीसाठी उसळणाऱ्या वाढीव गर्दीमुळे वाढीव डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि.२ एप्रिलपासून ही स्पेशल २३ डब्यांसह सुधारित वेळेनुसार धावणार आहे. दि.३ जुलैपर्यंत रेल्वे धावणार असून, वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. बुधवार व शुक्रवारी धावणार आहे.
माठासाठी मागणी
रत्नागिरी : गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ३५० पासून ६५० रुपये किमतीचे माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. स्थानिक माठ २०० रुपयांपासून विकण्यात येत आहेत. आकर्षक मातीच्या बाटल्याही विक्रीसाठी आल्या आहेत. कोल्हापूर येथून माठ विक्रीसाठी आणले जात आहेत. विविध आगारांतील, तसेच आकर्षक रंगकाम केलेल्या माठांना अधिक मागणी होत आहे.
आज आंदोलन
रत्नागिरी : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ राज्य शाखेतर्फे दि.२२ मार्च रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. १८ फेब्रुवारी, २०२१च्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या महाराष्ट्र शासन निर्णयाविरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे. पदोन्नतीची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कुस्ती स्पर्धेसाठी निवड
खेड : जिल्हा कुस्ती असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत एल.टी.टी इंग्लिश मीडियम स्कूलमधील ओंकार दुधाळ योने ४२ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले आहे. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
टायरची मागणी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी सेवा सुस्थितीत येण्यासाठी चारशे टायर आवश्यक असून, हे टायर उपलब्ध झाल्यास गावागावामध्ये नियाेजित वेळेत एसटी पोहोचण्यास मदत होणार असल्याचे विभागनियंत्रक सुनील भोकरे यांनी सांगितले. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियोजित एसटी गाड्या सोडण्यासाठी एसटीला ४०० टायरची आवश्यकता आहे.
भोई समाज विकास संघाची बैठक
देवरूख : रत्नागिरी जिल्हा भोई समाज विकास समितीतर्फे समाजातील तरुण व होतकरूंच्या हाताला काम देण्यासाठी भोई समाज पतसंस्थेची उभारणी करणे आवश्यक असल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटेकर यांनी दिली. यावेळी संघटनेची पुढील धोरणे व उद्दिष्टे मांडण्यात आली. समाजाला येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
जुगाईंची पालखी भेटीला
रत्नागिरी: शिमगोत्सवाच्या निमित्ताने टेंभ्ये येथील श्री देव भैरी जुगाई देवस्थानची पालखी श्रीदेव भैरी, झाडगाव येथे भैरीभेटीसाठी दि.२८ मार्च रोजी जाणार आहे. पालखी मार्गक्रमणामध्ये आरती, ओटी स्वीकारली जाणार नाही. टेंभ्येचा शिमगोत्सव सर्व सरकारी नियम व अटींचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे.