जून, जुलैची सरासरी ओलांडली तरी ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण निम्मेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST2021-08-29T04:30:42+5:302021-08-29T04:30:42+5:30
रत्नागिरी : यंदा जून आणि जुलै महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली असली तरी ऑगस्ट महिन्यातील पाऊस मात्र सरासरीच्या तुलनेने कमी ...

जून, जुलैची सरासरी ओलांडली तरी ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण निम्मेच
रत्नागिरी : यंदा जून आणि जुलै महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली असली तरी ऑगस्ट महिन्यातील पाऊस मात्र सरासरीच्या तुलनेने कमी झाला आहे. सध्याही पावसाच्या किरकोळ सरी पडत असल्याने उकाड्यात वाढ होऊ लागली आहे. बदलत्या वातावरणामुळे आजारपणही वाढले आहे.
यंदा पाऊस अधिक पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार पावसाचा प्रवास तसा होऊ लागला होता. १६ मे रोजी झालेल्या ताैक्ते वादळाच्या प्रभावाने १ जूनपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला. जुलै महिन्यातही पावसाने अतिवृष्टी धरली. त्यामुळे या महिन्यात १८१५ मिलीमीटर इतका पाऊस झाला; मात्र ऑगस्स्ट महिन्यात पुन्हा प्रमाण कमी झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. या कालावधीत साधारणपणे ३३६४ मिलीमीटर पाऊस पडतो. जून महिन्यात साधारणपणे ८१८ मिलीमीटर पाऊस पडतो. जुलै महिन्यात त्यापेक्षा अधिक साधारणत: १२८६ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. तर ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर कमी होतो. या महिन्यात ८२९ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते; मात्र यंदा २५ ऑगस्टपर्यंत केवळ ३६२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
वातावरण बदलले काळजी घ्या...
जून आणि जुलै हे दोन महिने पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. या महिन्यात पाऊस अधिक पडतो. यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाचा जोर कमी झाला होता. जुलै महिन्यात १६ जुलैपासून पावसाने मुसळधार पडण्यास सुरुवात केली. त्यामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ९११ मिलीमीटर इतका पाऊस झाला तर जुलैअखेर १८१५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाचे प्रमाण अधिकच कमी होऊ लागले आहे. आतापर्यंत ३८० मिलीमीटर इतकाच पाऊस झाला आहे. म्हणजेच या महिन्याच्या सरासरीपेक्षाही निम्म्यानेच पाऊस झाला आहे.
गेल्या आठवड्यात तर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांत पुन्हा किरकोळ सरी पडत आहेत. अचानक वातावरण बदलले असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. कोरोना काळात ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी हेही आजार वाढत आहेत.