हाॅटेल व्यावसायिकांबरोबरच अन्य पर्यटन व्यावसायिक आले मेटाकुटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:45+5:302021-04-11T04:30:45+5:30
गेल्या मार्च महिन्यात लाॅकडाऊन झाल्यानंतर सर्वच ठिकाणाबरोबरच धामिक आणि पर्यटनस्थळांवरही बंदी आली. मोठ-मोठी हाॅटेल्स त्याचबरोबर लाॅज, मंदिराबाहेरील फुले तसेच ...

हाॅटेल व्यावसायिकांबरोबरच अन्य पर्यटन व्यावसायिक आले मेटाकुटीस
गेल्या मार्च महिन्यात लाॅकडाऊन झाल्यानंतर सर्वच ठिकाणाबरोबरच धामिक आणि पर्यटनस्थळांवरही बंदी आली. मोठ-मोठी हाॅटेल्स त्याचबरोबर लाॅज, मंदिराबाहेरील फुले तसेच विविध पूजेचे साहित्य विक्री करणारे विक्रेते यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. निवास, न्याहरी योजना राबविणारे तसेच अन्य खासगी छोटे व्यावसायिक यांचे व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्यावर मंदीचे सावट पसरले. दहा महिने सर्वच बंद होते. या काळात या व्यावसायिकांकडे असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन, व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, भाडे, वीजबिल, पाणीबिल आणि कुटुंबाचा रेाजचा खर्च कसा करायचा, ही चिंता उभी राहिली. काम बंद राहिले तरी कर्मचाऱ्यांचा पगार आणि अन्य खर्च करावाच लागत होता. व्यवसाय ठप्प झाल्याने काहींवर उपासमारीची वेळ आली. या काळात या व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले. ऑक्टोबर- नोव्हेंबर या महिन्यात सर्व काही सुरळीत होईल, असे वाटत होते. डिसेंबरपासून लाॅकडाऊन पूर्णपणे शिथील झाल्यानंतर हे व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाले. जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात घरात बसलेले पर्यटक दहा महिन्यानंतर पर्यटनासाठी बाहेर पडले. मात्र, मार्च सुरू होताच पुन्हा कोरोनाचे प्रमाण वेगाने वाढू लागले आहे. त्यामुळे शासनाने आता मिनी लाॅकडाऊन सुरू केले असून सुटीच्या कालावधीत म्हणजेच, प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या सुटीच्या दोन दिवसांच्या कालावधीत कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सुटीच्या कालावधीत थोड्या फार प्रमाणात सुरू झालेल्या पर्यटनाला खीळ बसणार आहे. त्यामुळे यावर्षीही महत्त्वाचा असलेला उन्हाळी पर्यटन हंगामही कोरडाच जाणार असल्याने या व्यावसायिकांना पुन्हा लाखो रुपयांच्या नुकसानाचा सामना करावा लागणार आहे.
चौकट
गेल्यावर्षी उन्हाळ्याचा हंगाम वाया गेल्यानंतर पर्यटकांअभावी सर्व खोल्या पडून राहिल्या. त्यामुळे हाॅटेल्स, लाॅज यामधील ए. सी. फ्रीज बंद ठेवता न आल्याने त्यांचे वीजबील सुरूच राहिले. मात्र, ही उपकरणे बंद राहिल्याने नादुरुस्त झाली. अन्य साहित्यांचीही अपरिमित हानी झाली. त्यामुळे या व्यावसायिकांना दुहेरी आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.
चौकट
यावर्षी हिवाळ्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने पर्यटक डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध पर्यटनस्थळी आले. त्यामुळे हा हंगाम चांगला गेला. त्यामुळे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येण्याची आशा निर्माण झाली होती. त्यादृष्टीने कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेत या व्यावसायिकांनी सर्व सज्जताही ठेवली होती. मात्र, या उन्हाळ्याच्या हंगामात पुन्हा काेरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाला नाईलाजाने लाॅकडाऊन करावे लागल्याने आता पुन्हा सर्वच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना पुन्हा मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.