दत्तक गावात कृषी साहित्याचे वाटप
By Admin | Updated: May 25, 2015 00:39 IST2015-05-24T22:07:17+5:302015-05-25T00:39:16+5:30
संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत पहिला कार्यक्रम

दत्तक गावात कृषी साहित्याचे वाटप
दापोली : संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत आसूद गावात खासदार गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते विविध कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले. आसूद गाव दत्तक घेतल्यानंतर कीर्तीकर यांनी विविध योजनांतर्गत या गावातील ग्रामस्थाना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या गावातील १५० शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी तहसीलदार कल्पना गोडे, गटविकास अधिकारी डॉ. मनीषा देवगुणे, विस्तार अधिकारी रुके उपस्थित होते. आसूद गाव दत्तक घेतल्यानंतर या गावाचा विकास आराखडा पूर्णपणे तयार झाला असून, या विकास आराखड्यानुसार खासदार गजानन कीर्तीकर गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या गावाचा चेहरा बदलून आदर्श गाव बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु झाले आहेत. खासदार कीर्तीकर यांनी या गावात आरोग्य शिबिर, महिला प्रशिक्षणवर्ग, रेशन कार्ड वाटप, आधारकार्ड, ज्येष्ठ नागरिक दाखले वाटप आदी विविध उपक्रम राबविले आहेत. (प्रतिनिधी)