लाभार्थी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST2021-05-23T04:31:36+5:302021-05-23T04:31:36+5:30

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : खरीप हंगामासाठी पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. यावर्षी ७५३ ...

Allocation of crop insurance amount to the beneficiary farmers | लाभार्थी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेचे वाटप

लाभार्थी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेचे वाटप

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. यावर्षी ७५३ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. आतापर्यंत २५१ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी २३८ शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. उर्वरित १३ लाभार्थ्यांची नुकसानभरपाईची रक्कम मात्र लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात मुख्यत्वे भात पिकाचे उत्पादन घेण्यात येते. जिल्ह्यात ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येते. पावसावर अवलंबून भात शेती असून, जिल्ह्याची भाताची उत्पादकता चांगली आहे. भाताच्या उत्पादकतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तर विमा परतावा देण्यात येतो. मात्र, उत्पादकता चांगली असल्याने गेल्या दोन वर्षांपर्यंत शेतकऱ्यांना विमा परतावा प्राप्त झाला नव्हता. मात्र, गेले दोन वर्षे काढणी पश्चात भात शेतीच्या पावसामुळे व पुरामुळे नुकसान होत असल्याने काढणी पश्चातील नुकसानीचा समावेश विमा योजनेंतर्गत करण्यात आला आहे. यावर्षी काढणी पश्चात २३० शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना १४ लाख २७ हजार ७०० रुपयांचा परतावा प्राप्त झाला आहे. महसूल मंडलातील १३ लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगानंतर परतावा दिला जाणार आहे. त्याचे वितरण रखडले आहे.

७० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन

भात पिकाचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तर पीक विमा परतावा दिला जातो. मात्र, कोकणात ७० टक्क्यांपेक्षा उंबरठा उत्पादन आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विमा योजनेंतर्गत लाभ मिळाला नव्हता. २०१९ मध्ये पुरामुळे नुकसान झाल्याने सरसकट नुकसानभरपाई देण्यात आली होती.

उत्पादकता चांगली

जिल्ह्यातील ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पादन घेण्यात येते. जिल्ह्याची भाताची उत्पादकता २४.७३ क्विंटल आहे. उत्पादकता जिल्ह्याची चांगली आहे; परंतु भात पीक काढणीनंतर अवेळीच्या पावसामुळे होत असलेले नुकसान ग्राह्य धरून शेतकऱ्यांना परतावा देण्यात येत आहे. यावर्षी २३८ शेतकऱ्यांना काढणी पश्चात झालेल्या नुकसानीबद्दल परतावा प्राप्त झाला आहे. पीक कापणी प्रयोग महसूल मंडलांतर्गत राबविण्यात येतो. प्रत्येक महसूल मंडळात हा प्रयोग राबविल्यानंतर उत्पादकता निश्चित केली जाते. कमी उत्पादकता असणाऱ्या मंडलातील शेतकऱ्यांना परतावा दिला जाणार आहे.

भाताचे उत्पादन घेत असताना कापलेले पीक शेतावर भिजून होत असलेले नुकसान आता ग्राह्य धरू लागल्याने विमा परताव्याची रक्कम प्राप्त झाली आहे. प्रथमच यावर्षी परतावा प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास बळावला आहे. नक्कीच भविष्यात विमा योजनेकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल.

- रवींद्र शेलार, शेतकरी

पावसावर भात पिकाचे उत्पादन अवलंबून असले तरी आतापर्यंत विमा परताव्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता. सरसकट उंबरठा उत्पादनावर परताव्यासाठी निकष लावण्यात येत होते. ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तर परतावा दिला जातो त्यामुळे आतापर्यंत शेतकरी वंचित होते.

- अनिता गुरव, शेतकरी

गेल्या दहा वर्षांतील सरासरी उत्पादनानंतर सलग तीन वर्षांपेक्षा कमी उत्पादनावर उंबरठा उत्पादन ठरविण्यात येते. जिल्ह्याचे उंबरठा उत्पादन चांगले आहे. त्यामुळे उत्पादनाचा निकष परताव्यासाठी लावला जात होता. मात्र, आता निकष बदलेले आहेत. कोकणसाठी निकष वेगळे लावणे गरजेचे आहे.

- संतोष रामाणी, शेतकरी

Web Title: Allocation of crop insurance amount to the beneficiary farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.