सर्वपक्षीय एकमत गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST2021-08-14T04:36:58+5:302021-08-14T04:36:58+5:30
७४० किलाेमीटर लांबीचा हा मार्ग महाड, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवार व उडुपी या प्रत्येकी १०० किलाेमीटर ...

सर्वपक्षीय एकमत गरजेचे
७४० किलाेमीटर लांबीचा हा मार्ग महाड, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवार व उडुपी या प्रत्येकी १०० किलाेमीटर लांबीच्या ७ भागांमध्ये विभागण्यात आला व प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. परदेशामधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली. लार्सन ॲण्ड टुब्रो, गॅमन इंडिया या भारतामधील मोठ्या बांधकाम कंपन्यांना बांधकामाची कंत्राटे दिली गेली. भूसंपादनामधील अडथळे, अनेक कोर्ट खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात येणारे पूर व कोसळणाऱ्या दरडी इत्यादी बाबींमुळे कोकण रेल्वेच्या बांधकामाचे वेळापत्रक खूप रखडले. कोकण रेल्वे मार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी या मार्गाचे काम डिसेंबर १९९६मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ७ वर्ष ३ महिन्यांचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. कोकण रेल्वेच्या निर्मितीमध्ये अनेक अडचणी आल्या. जवळपास ४७ हजार कुटुंब विस्थापित झाली. असे असले तरी अनेक अडचणींवर मात करत कोकणची भाग्यरेखा कोकण रेल्वे आता सुरु आहे. सन १९९० ते ९८ या कालावधीत हा रेल्वे मार्ग पूर्ण करताना निर्माण झालेली आर्थिक अडचण लक्षात घेऊन एकेरी मार्ग बनवला. पण आज केंद्र सरकारने ठरवले आणि कोकणातील सर्वपक्षीय नेत्यांनी ठाम निर्णय घेतला तर हाच रेल्वे मार्ग दुहेरी करता येईल. आज जी कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती आहे, त्यापेक्षा दहापटीने हा दुहेरी मार्ग मिळवून देईल. शिवाय वाशिष्ठी नदीचे पाणी परशुरामच्या टेकडीवर लिफ्ट करून नवीन रेल्वे मार्गाच्या बाजूने दक्षिणेकडे गोव्यापर्यंत व उत्तरेकडे ठाण्यापर्यंत सायपल पद्धतीने नेता येईल.
कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न पाहणारे नेते आज जरी हयात नसतील तरीसुद्धा सध्याच्या नेत्यांनी एकत्रित येऊन यावर विचार केला तर हा दुहेरी मार्ग आणि सायपल पद्धतीने पाणी पुरवठ्याची योजना अद्ययावत तंत्रज्ञानाने अवघ्या ३ ते ४ वर्षांत पूर्ण होईल . जेणेकरून कोकणात रोजगार निर्मिती होऊन सुजलाम् सुफलाम् कोकण पाहायला मिळेल. त्यासाठी मात्र सर्वपक्षीय नेत्यांचे या विषयावर एकमत होणे गरजेचे आहे.
- डॉ. गजानन पाटील