लाॅकडाऊनमध्ये दारू मिळेना, दुकाने बंदमुळे विक्रीही घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:44+5:302021-05-27T04:32:44+5:30
अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गतवर्षीपासून काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लाॅकडाऊनचा परिणाम दारू विक्रीवरही झाला. बंद दुकानांमुळे तळीरामांचे ...

लाॅकडाऊनमध्ये दारू मिळेना, दुकाने बंदमुळे विक्रीही घटली
अरुण आडिवरेकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गतवर्षीपासून काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लाॅकडाऊनचा परिणाम दारू विक्रीवरही झाला. बंद दुकानांमुळे तळीरामांचे घसे काेरडेच राहिले. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील देशीच्या विक्रीत १२ टक्के, विदेशीच्या ६ टक्के, तर बिअरच्या विक्रीत ९ टक्के इतकी घट झाली आहे. वर्षभरात तब्बल ८,५८,३३,७९९ लिटर दारूची विक्री घटली आहे.
दारूचीही दुकाने बंद ठेवण्यात आल्याने तळीरामांची अडचण झाली हाेती. अनेकांनी घरात आधी ठेवलेल्या मद्याचे घाेट रिचवत लाॅकडाऊन संपण्याची वाट पाहिली, तर काहींनी लाॅकडाऊन जाहीर हाेताच घरात ‘स्टाॅक’ करून ठेवत लाॅकडाऊन संपेपर्यंत ‘पेग’ मारले. पण, अनेकांना एक घाेटही रिचवता आला नाही.
जिल्ह्यात २०१९ - २० मध्ये एकूण ९,४४,४५,३९४ लिटर दारूची विक्री झाली हाेती; तर २०-२१ मध्ये ८६,११,५९५ लिटर इतकीच विक्री झाली आहे. २०१९-२० या वर्षात देशी दारूची २५,८०,९२८ लिटर इतकी विक्री झाली, तर २०२०-२१ मध्ये २२,७४,७०१ लिटर इतकी विक्री झाली. विदेशीची २०१९-२० मध्ये २५,७४,०६२ लिटर, तर २०२०-२०२१ मध्ये २४,३०,६२४ लिटर इतकी विक्री झाली. बिअरच्या विक्रीतही घट हाेऊन ४२,९०,४०४ लिटरवरून ३९,०६,२७० लिटरवर येऊन पाेहोचली. मात्र, या कालावधीत वाईनच्या विक्रीत २८ टक्क्यांनी वाढ झाली.
महसूलला दारूचा आधार!
- दारूच्या विक्रीतून मिळणारा महसूल माेठ्या प्रमाणात आहे. मात्र, या व्यवसायामध्ये जेथे दारूची निर्मिती हाेते, तेथेच महसूल मिळताे. रत्नागिरी जिल्ह्यात केवळ एकच देशी दारू निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यातून १९-२० मध्ये ४,९६,६६,४२२ रुपये, तर २०-२१ मध्ये ४,९३,१२,३३८ रुपये इतका महसूल मिळाला.
चार काेटींचा माल जप्त
- राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात एकूण २,८९४ इतके गुन्हे दाखल केले. या कारवाईत ४,२९,८९,४२२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
- गाेवा बनावटीच्या दारूची माेठ्या प्रमाणात विक्री हाेत असल्याने त्याकडे लक्ष ठेवण्यात आले हाेते. वर्षभरात ९,९१२ लिटर गाेवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली.
- लाॅकडाऊनमध्ये देशी, विदेशी आणि बिअरच्या विक्रीत घट झाली असली, तरी वाईनच्या विक्रीत चांगलीच वाढ झाली हाेती. अनेकांनी वाईनची खरेदी करण्यावर भर दिला हाेता.
२०१९-२० मध्ये वाईनची ६०,९९७ लिटर इतकी विक्री झाली हाेती. हीच विक्री २०२०-२१ मध्ये ७८,११७ लिटर इतकी झाली हाेती.
- देशी, विदेशी आणि बिअरच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळते; पण ही विक्री कमी झाल्याने व्यावसायिकांचा ताेटा झाला.
सध्या दारूची दुकाने अंशत: सुरू आहेत. दुकाने उघडी नसल्याने अनेकजण हातभट्टी दारूचा आधार घेतात. ही दारू आराेग्यास हानीकारक आहे. त्यामुळे हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची माेहीम राबवण्यात येत आहे. याबाबत काेणाला माहिती मिळाल्यास नक्की द्यावी.
- व्ही. व्ही. वैद्य, प्रभारी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क