ऐन सणात एस. टी. बंद, प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:03+5:302021-09-15T04:37:03+5:30

लांजा : ऐन गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच लांजा आगाराने मंगळवारी दुपारनंतर ग्रामीण भागातील सर्वच एस. टी. फेऱ्या रद्द केल्याने ...

Ain Sanat S. T. Closed, passenger condition | ऐन सणात एस. टी. बंद, प्रवाशांचे हाल

ऐन सणात एस. टी. बंद, प्रवाशांचे हाल

लांजा

: ऐन गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच लांजा आगाराने मंगळवारी दुपारनंतर ग्रामीण भागातील सर्वच एस. टी. फेऱ्या रद्द केल्याने सकाळी लांजा येथे आलेल्या प्रवाशांचा परतीचा प्रवासाचा मार्ग बंद झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले.

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असल्याने गावी आलेले चाकरमानी व नागरिक गणपती बापाच्या दर्शनासाठी आपले नातेवाईक, मित्रमंडळींकडे जाण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडतात. दर्शन झाल्यावर जेवण आटोपून निवांत आपल्या घरी जातात. यासाठी सर्वच लोक एस. टी. चा वापर करतात. मंगळवारी गणपती विसर्जन असल्याने गणपती दर्शनासाठी, तसेच खरेदीसाठी लांजा येथे आलेल्या नागरिकांना एस. टी. बंद केल्याचा चांगलाच फटका बसला आहे.

मंगळवारी दुपारनंतर ग्रामीण भागातील एस. टी. सेवा पूर्णतः बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक बसस्थानकामध्ये बसलेल्या प्रवाशांना धक्काच बसला. घरच्या गणपतीचे विसर्जन असल्याने परतीची घाई असलेल्या या लोकांचा मार्गच बंद झाला. ग्रामीण भागातून आलेल्या असंख्य प्रवाशांना रिक्षा किंवा खासगी वाहनाशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक तोटा सहन करावा लागला.

गणपती विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी लोक लगेचच परतीच्या प्रवासाला जाणार आहेत. मंगळवारी रात्री लांजा आगारातून चार एस. टी. बसचे बुकिंग करण्यात आले आहे. मात्र, दुपारनंतर एस. टी. सेवा बंद झाल्याने त्यांच्यासमोरही लांजापर्यंत येण्याची मोठी समस्या निर्माण झाली. त्यांनाही खासगी सेवेचा आधार घेत लांजापर्यंत यावे लागले.

लांजा आगार स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच गणपती उत्सवाच्या कालावधीत दुपारनंतर एस. टी. सेवा बंद केल्याची घटना आहे. सध्या लांजा आगाराचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. मनाला वाटेल तेव्हा गाड्या सोडणे व मनाला वाटेल तेव्हा बंद करणे असे प्रकार केले जात आहेत. बसस्थानकात प्रवासी बसलेले असतानाही भारमन मिळत नसल्याचे कारण देत दुपारनंतर ग्रामीण भागातील एस. टी. फेऱ्या बंद, तसेच वस्तीच्या फेऱ्याही बंद करण्यात आल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.

Web Title: Ain Sanat S. T. Closed, passenger condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.