भात नुकसानाबाबत कृषी विभाग अनभिज्ञ
By Admin | Updated: November 6, 2014 22:06 IST2014-11-06T21:22:03+5:302014-11-06T22:06:31+5:30
गुहागरातील प्रकार : परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने ओढवले संकट

भात नुकसानाबाबत कृषी विभाग अनभिज्ञ
असगोली : गुहागर तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपल्याकडे कोणत्याही शेतकऱ्याने नुकसानाची नोंद केलेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आम्ही कार्यालयात बसून वाट पाहात आहोत, असे येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्याने कृषी विभागाच्या या अजब कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वर्षभर शेतामध्ये राबायचे आणि जेव्हा शेतीचे उत्पन्न येते त्यावेळी ऐन पावसाने हातचे पीक हिरावून न्यायचे, अशी स्थिती सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. तयार झालेली भातशेती पावसामुळे जमिनीवर पडली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले शेत भिजल्याने नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. काही भातशेतीची कापणी झाली असली तरी महान जातीच्या शेतीची कापणी सुरू आहे. नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचा कोणीतरी येईल, अशी वाट पाहून अखेर नुकसान होऊ नये, म्हणून जे मिळेल ते आपले असे म्हणत कापणीला लागलेल्या शेतकऱ्यांनी आपले काम सुरूच ठेवले आहे.
मात्र, तालुका कृषी कार्यालयात बसून नुकसानग्रस्त शेतकरी आपले नुकसान झाले आहे, अशी विनंती करीत येईल आणि त्यानंतर त्याच्या शेताचा सर्वे करुन शासनाकडे अहवाल पाठवू, असे नियोजन करून अधिकारी व कृषी सहाय्यक कार्यालयात बसून शेतकऱ्यांची वाट पाहत आहेत. मात्र, या अजब कारभारामुळे शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग की कृषी विभागासाठी शेतकरी? असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुक्यात सुमारे ४ हजार हेक्टर भातशेती आहे. त्यापैकी १२०० हेक्टर महान भातशेती कापणी शिल्लक आहे. एकूण कापणी शिल्लक असलेल्या भातशेतीपैकी ५० टक्क्याहून अधिक नुकसान झाले तरच शासन शेतकऱ्यांना भातशेती नुकसानभरपाई देते. मात्र, पाऊस पडून दोन दिवस झाले तरी कोणत्याही कृषी सहाय्यकाला एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये डोकावून पाहण्यास वेळ नाही. ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्या भागातील शेतीची तेथील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकाने पाहणी करुन कार्यालयाकडे अहवाल देणे बंधनकारक आहे. मात्र, असे कोणतेच चित्र तालुक्यात पाहावयास मिळत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यात भातशेतीच्या झालेल्या नुकसानाची माहिती मागविली असताना तलाठी, ग्रामसेवक व कृषी विभाग यापैकी कोणालाही नुकसानाची माहिती देता आली नाही. (वार्ताहर)