स्वच्छतेसाठी अजेंडा हाती

By Admin | Updated: February 20, 2015 23:15 IST2015-02-20T21:22:35+5:302015-02-20T23:15:18+5:30

चंद्रकांत कदम : खेड तालुका निर्मल करण्यासाठी प्रयत्न

Agenda to clean up | स्वच्छतेसाठी अजेंडा हाती

स्वच्छतेसाठी अजेंडा हाती

खेड : जिल्हाभरातील अनेक ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत. मात्र, ही आकडेवारी समाधानकारक नाही. जिल्हाभरात अद्याप ८८ ग्रामपंचायती शौचालयाविना आहेत. खेड तालुक्यात १८ ग्रामपंचायतींना अद्याप शौचालये नाहीत. आता निर्मल ग्राम योजनेची काटेकोर अंमलबजावणी करून खेड तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींना शौचालये उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सभापती चंद्रकांत कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.खेड तालुका निर्मलग्राम करणार असून, ते आपले कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. उघड्यावर शौचाय बसणे हे कोणत्याही रोगराईस आमंत्रण देण्यासारखे आहे. याबाबत अनेकांनी अनेक ठिकाणी जनजागृतीही केली. मात्र, याविषयी किती लोक जागरूक झाले, हा संशोधनाचा विषय बनून राहिला आहे. ग्रामीण भागातील हे चित्र बदलण्यासाठी राज्य सरकारने निर्मल ग्राम योजना अमलात आणली. ग्रामीण भागात उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण मोठे आहे. हे टाळण्यासाठी सरकारने या योजनेस मूर्त स्वरूप दिले. साधारणपणे ६ ते ७ वर्षांपूर्वी ही स्थिती गंभीर होती. आज यामध्ये काही प्रमाणात बदल झाला. गावे निर्मल झाली असली तरीही याचे प्रमाण समाधानकारक नाही. अनेक गावपुढाऱ्यांनी सरकारी योजनांचा अनावश्यक लाभ घेतला आहे. तरीही वैयक्तीक शौचालयांची आकडेवारी तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. जिल्ह्यातील २० टक्के कुटुंब आजही शौचालयाविना आहेत. जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायती आजही शौचालयाविना आहेत, तर ३ लाख ६४ हजार ९८० कुटुंबांकडे आजही शौचालये नाहीत. शौचालयाविना असलेली दारिद्र्यरेखेखालील आणि दारिद्र्यरेषेवरील कुटुंबांची यादीही हजारोंच्या घरात आहे. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रूपये अनुदान, तर निर्मल ग्राम योजनेतून १० हजार रुपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात गुहागर आणि लांजा हे दोन तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही तालुके निर्मल झाले आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेने २०२२पर्यंत निर्मल भारत अभियानअंतर्गत जिल्ह्यात सर्वत्र शौचालये बांधून पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले असल्याचे सभापती कदम यांनी सांगितले.
सर्व पंचायत समित्यांनी शौचालयांकरिता प्रस्ताव मागवले असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आवश्यक असल्याचा सूर आळवला जात आहे. खेडमध्ये ही परिस्थिती गंभीर नाही. मात्र, १८ ग्रामंपचायतींकडे आर्थिक परिस्थितीअभावी आजही शौचालये नाहीत. याकरिता त्यांना शौचालये बांधून देण्याच्या कामी सभापती चंद्रकांत कदम यांनी पुढाकार घेतला आहे. इतर ग्रामपंचायतींसमवेत मागे असलेल्या ग्रामपंचायतींनाही सोबत घेऊन जाणार असून, निर्मल ग्राम योजनेत त्यांनाही स्थान देणार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Agenda to clean up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.