सुमारे ८७०० किलाेमीटरचा प्रवास करून प्रणाली पाेहाेचली रत्नागिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:46+5:302021-05-28T04:23:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट (ता. वणी) या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी ...

सुमारे ८७०० किलाेमीटरचा प्रवास करून प्रणाली पाेहाेचली रत्नागिरीत
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट (ता. वणी) या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरुणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती व सायकलिंगचा प्रचार करण्यासाठी ती भ्रमंतीला बाहेर पडली आहे. सुमारे ८,७०० किलोमीटरचा प्रवास करून प्रणाली रत्नागिरीत पाेहाेचली आहे. तिथून पुढे सिंधुदुर्ग व कोल्हापूरमार्गे ती परत आपल्या गावी जाणार आहे.
अवघ्या २१ वर्षीय प्रणालीने समाजकार्यातील पदवी मिळवली आहे. तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आई-वडील शेती करत असून, तिला दोन बहिणी आहेत. सभोवतालचे वाढते प्रदूषण, तापमान वाढ, वातावरण व ऋतूचक्र बदलातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या व शेतीच्या समस्या या जाणिवेतून आणि कोरोना महामारीत प्रत्यक्ष पर्यावरण ऱ्हास हीच शिकवण या गोष्टींमुळे प्रणालीने सायकलवरुन महाराष्ट्र भ्रमंती करण्याचा उपक्रम हाती घेतला.
कुठल्या शासकीय किंवा खासगी संस्थेतर्फे तिने हा प्रवास सुरू केलेला नाही. ना प्रवासासाठी कोणाची स्पॉन्सरशिप आहे. तिने स्वजबाबदारीवर हा प्रवास सुरू केला आहे. लोकांकडे खाणे, राहणे असते. सोबत आर्थिक मदतसुद्धा लोकच करतात. ७ महिने झाले प्रवासाला, ८,७०० किलोमीटरचा प्रवास झाला. या उपक्रमासाठी गंधार कुळकर्णी, राजा रेणू दांडेकर, दिलीप कुळकर्णी यांचे सहकार्य मिळाल्याचे प्रणालीने सांगितले.
---------------------
ती प्रवासात नेमके काय करते ?
सध्या सायकलने प्रवास करत ती आदिवासी, ग्रामीण, शहरी भागातील लोकांना व तरुणांना भेटते, त्यांच्याशी संवाद साधते. स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणांमध्ये भेट देऊन जनजागृती करणे व माहिती पोहोचविणे, शक्य झाले तर त्या-त्या लोकांशी बोलून समस्यांबाबत चर्चा करणे, आरोग्याबाबत जनजागृती व प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालविणे हा संदेश देते.
---------------
सरावासाठी दारोदार पेपर टाकले
प्रणाली लहानपणापासून सायकलिंग करते. या मोठ्या प्रवासासाठी तिने काही महिने सायकलवरुन पेपर टाकले आहेत. त्यातून सरावही झाला व पैसेही मिळाल्याचे प्रणालीने सांगितले.
-------------------
पाच संकल्प करण्याचे आवाहन
१) वायू, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी शक्य ती कामे सायकलने करुया.
२) प्लास्टिक बाटल्यांचा वापर टाळूया. घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बाटली सोबत ठेवूया.
३) परिसरात झाडे लावूया व जगवूया. अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करुया.
४) आपला परिसर आपण स्वच्छ ठेवूया.
५) पाणी बचत व पाणी जिरवा यात सहभाग घेऊया.