मराठा समाजापाठोपाठ आता गवळी समाज आक्रमक
By मनोज मुळ्ये | Updated: January 28, 2024 15:44 IST2024-01-28T15:44:27+5:302024-01-28T15:44:58+5:30
तिसऱ्या सूचीमधील नोंदीसाठी राज्यभर मेळावे घेणार

मराठा समाजापाठोपाठ आता गवळी समाज आक्रमक
मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, देवरुख : मराठा समाजाने केलेल्या आंदोलनामुळे आरक्षणाचा अध्यादेश निघाल्याने आता राज्यातील गवळी समाजही आरक्षणासाठी आक्रमक होत आहे. सद्यस्थितीत गवळी समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळत असले तरी केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये आरक्षण मिळावं, यासाठी राज्यभर मेळावे घेतले जाणार आहेत. त्याची सुरुवात संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे झाली आहे.
राज्यातील गवळी समाजाचा पहिला मेळावा रविवारी देवरुख येथे झाला. राज्यात गवळी समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या अडीच टक्के आहे. गवळी समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळते. पण केंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा मिळण्यासाठी तसेच निवडणुकीतही याचा फायदा मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये गवळी समाजाची नोंद व्हावी, अशी प्रमुख मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे. गवळी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ, सध्या असलेले २.५ टक्के आरक्षण ३ टक्के करावे, तांडा वस्तीसाठी भरीव निधी उपलब्ध करावा, गवळी समाजातील लोककलांसाठी गवळी अकादमी स्थापन करण्यात यावी यासह अन्य काही मागण्याही करण्यात आल्या आहेत.
या मेळाव्याला संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या भागातून मोठ्या संख्येने गवळी समाज बांधव एकत्र आले होते. असेच मेळावे राज्यभर घेतले जाणार आहेत. त्यातून समाजजागृती करुन नंतर पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. या मेळाव्याला हिरामण गवळी, शंकरशेठ माटे, चंद्रकांत भोजने, तुषार खेतल, अजय बिरवटकर, अविनाश कांबळे, बबन बांडागळे, गंगाराम टोपरे, विठोबा खेतल, आत्माराम चाचे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.