Maratha Kranti Morcha रत्नागिरीत पोलिसांच्या सूचनेनंतर आंदोलन मागे, पाली बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 17:53 IST2018-07-24T17:50:12+5:302018-07-24T17:53:12+5:30
मराठा आरक्षणासाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असतानाच जिल्ह्यात लागू केलेल्या जमावबंदी आदेशामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला. मनाई आदेश असल्याने त्याचे उल्लंघन न करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Maratha Kranti Morcha रत्नागिरीत पोलिसांच्या सूचनेनंतर आंदोलन मागे, पाली बाजारपेठ बंद
रत्नागिरी : मराठा आरक्षणासाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मराठा समाजातील बांधवांनी दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत दुकाने बंद करण्यासाठी सूचना दिल्या.
जे. के. फाईल्सपासून दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असतानाच जिल्ह्यात लागू केलेल्या जमावबंदी आदेशामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला. मनाई आदेश असल्याने त्याचे उल्लंघन न करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यात ठिकठिकाणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी शहरात सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी बाजारपेठेतून फिरून दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.
रत्नागिरी शहरातील जे. के. फाईल्स येथून त्यांनी दुकाने बंद करण्यासाठी मोर्चा काढला. यामध्ये केशवराव इंदुलकर, अमोल डोंगरे, दीपक पवार, गोट्या साळवी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ही सर्व मंडळी शिवाजीनगर परिसरात आले असता पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. डिझेलचे वाढते दर, टोल खर्च मागण्यांसाठी २० जुलैपासून अखिल भारतीय मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसतर्फे राष्ट्रीय पातळीवर बंद पुकारलेला असून, राज्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व मोटार वाहतूक संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
यासह जिल्ह्यात इतर कारणांमुळे २३ जुलै ते ६ आॅगस्ट या कालावधीत जिल्हा दंडाधिकारी यांनी मनाई आदेश लागू केला असल्याची माहिती पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना दिली. त्यामुळे आपण या आदेशाचे उल्लंघन करू नये, अशी सूचना देताच आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
जिल्ह्यातील पाली परिसरात कार्यकर्त्यांनी बाजारपेठ बंद करून या बंदला प्रतिसाद दिला. तसेच कार्यकर्त्यांनी रास्तारोको करून वाहने अडवून धरली. यामुळे काहीकाळ वाहतूक खोळंबली होती.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरातही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली. तसेच महामार्गावर ठिय्या मांडला होता. जिल्ह्यातील अन्य ठिकाणीदेखील आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामुळे कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे सांगण्यात आले.