पतीच्या निधनानंतर शेतीने सावरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST2021-09-02T05:09:00+5:302021-09-02T05:09:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील शीळ येथील सुप्रिया सुभाष सावंत यांनी पतीच्या निधनानंतरही बारमाही शेती करीत ...

पतीच्या निधनानंतर शेतीने सावरले
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील शीळ येथील सुप्रिया सुभाष सावंत यांनी पतीच्या निधनानंतरही बारमाही शेती करीत असून, शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. घरालगतच एक एकर क्षेत्रावर पावसाळी भात, हळद व त्यानंतर भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत आहे. योग्य नियोजन व कठोर परिश्रमातून उत्पन्न मिळवित आहेत. सुप्रिया यांना तीनही मुलांचे शेतीच्या कामासाठी सहकार्य मिळत आहे.
घरालगतच शेती असल्यामुळे शेतीकडे लक्ष देणे सोपे होत आहे. एक एकर क्षेत्रावर भात व हळद लागवड केली आहे. पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत तयार करून हळदीसाठी वापरत आहेत. दरवर्षी ४० ते ५० किलो हळद पावडर तयार करून विक्री करीत असून, उत्पन्न मिळवित आहेत. पाच गुंठे क्षेत्रावर हळद लागवड करीत आहेत.
पाच गुंठ्यामध्ये हळदीची कंद लावल्यानंतर कंदाच्या मधल्या जागेत पालेभाज्यांची लागवड केली. कंदाची वाढ होईपर्यंत पालेभाजीचे उत्पन्न प्राप्त झाले. आंतरपिकामुळे आर्थिक फायदा तर झाला, शिवाय तणनियंत्रण झाल्याने खर्च वाचला. आंतरपिकातून उत्पन्नाचा मार्गही सापडला आहे.
भाजीपाला उत्पादन
भात काढल्यानंतर रब्बी हंगामात मुळा, माठ या पालेभाज्यांसह काही क्षेत्रावर भेंडी, वांगी, दोडका, पडवळ लागवडीतून उत्पादन घेण्यात येत आहे. भात काढणीनंतर सरी पद्धतीने पालेभाज्यांची लागवड केली जात आहे. भाजी विक्रीसाठी त्यांना फारशी अडचण येत नाही. भाजीपाल्यातून चांगला फायदा होतो, असेही सावंत यांनी सांगितले.
सेंद्रिय खताचा वापर
आंबा, काजूची झाडे असून, आंबा, काजू विक्रीतूनही उत्पन्न प्राप्त होत आहे. बागायतीपेक्षा भाजीपाला पिकावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. शेण, पालापाचोळा यापासून तयार केलेले सेंद्रिय खत पिकांसाठी वापर करीत आहेत. ज्यामुळे पिकांचे उत्पन्न व दर्जा उत्कृष्ट राखण्यास मदत होतो. रासायनिक खतांचा नाममात्र आहे.
बारमाही शेती
कृषी कार्यालयाकडून सावंत यांना मार्गदर्शन लाभत आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न येत नाही, परंतु रब्बी व उन्हाळी शेतीसाठी घरालगत असलेल्या विहिरीतून पाणी देणे शक्य होत आहे. पाणी मुबलक असल्याने त्यांना बारमाही शेती शक्य होत आहे. शेतीतून उत्पन्नाचा मार्ग सावंत यांनी शोधला असून, त्यामध्ये यश प्राप्त झाले आहे.
चार प्रकारच्या भात वाणाची लागवड
कृषी विभागाने सावंत यांना रत्नागिरी ४, सहा व २४ आदी विद्यापीठ प्रमाणित भाताचे वाण दिले होते. वेगवेगळ्या क्षेत्रात या वाणांची लागवड केली आहे, शिवाय उर्वरित क्षेत्रावर त्यांना पारंपरिक गावठी वाणाची लागवड केली आहे. कोणत्या क्षेत्रात चांगल्या प्रकारच्या भाताचे उत्पन्न मिळाले हे भात काढणीनंतरच समजणार आहे, जेणेकरून अन्य शेतकऱ्यांना बियाणे लागवडीबाबत माहिती प्राप्त होईल व बियाणे लागवडीकडे कल वाढेल, शिवाय शेतकऱ्यांना पाहिजे ते बियाणे उपलब्ध करून देता येणार असल्याचे सुप्रिया सावंत यांनी सांगितले.