मंडणगडातील प्रशासन कोविडच्या कामात फेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:40+5:302021-05-24T04:29:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : कोरोनाच्या गंभीर काळात मंडणगड तालुक्यातील अधिकारीच जनतेप्रती निष्काळजी असल्याची धक्कादायक बाब खासदार सुनील तटकरे ...

मंडणगडातील प्रशासन कोविडच्या कामात फेल
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : कोरोनाच्या गंभीर काळात मंडणगड तालुक्यातील अधिकारीच जनतेप्रती निष्काळजी असल्याची धक्कादायक बाब खासदार सुनील तटकरे यांच्या आढावा बैठकीत समाेर आली आहे. तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर व दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तालुक्यातील आणखी किती निष्पाप लोकांचे कोरोनाच्या चुकीच्या नियोजनामुळे बळी गेल्यावर तुम्ही जागे होणार, असा संतप्त सवाल तटकरे यांनी उपस्थित केला.
मंडणगड नगर पंचायतीच्या सभागृहात तालुक्यातील सर्वच प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कोविडच्या कामगिरीचा आढावा खासदार तटकरे यांनी घेतला. यावेळी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, उपविभागीय अधिकारी शरद पवार, महावितरणचे अधिकारी, तसेच अनेक खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. काेराेनाच्या काळात शासन मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी देऊनही अधिकारी जर काम करणार नसतील तर नाइलाजाने आम्हाला विचार करावा लागेल, कोणालाही सोडणार नाही असा दमच खासदार तटकरे यांनी भरला.
मंडणगडचे तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांना तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून तुम्ही कोरोनाच्या या गंभीर काळात काय उपाययोजना केली त्याचा आढावा घेत असताना तहसीलदार वेंगुर्लेकर मात्र त्यांच्याकडे कोणतेच उत्तर नसल्याने निरुत्तर झाले, तसेच गतवर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आणि नुकसानग्रस्त लोकांना मिळालेल्या भरपाईचा आढावाही यावेळी देता आला नाही. कोरोनाच्या काळात कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी आमदार अनिकेत तटकरे यांनी मंडणगड तालुक्यासाठी दिलेली अत्याधुनिक रुग्णवाहिका रुग्णांसाठी न वापरल्याने त्याचा मालवाहतूक करण्यासाठी केलेला वापर अत्यंत धक्कादायक बाब उघड होताच तटकरे चांगलेच खवळले. तालुक्यातील उपलब्ध ऑक्सिजन, बेडस् यांची माहिती घेतली असता अत्यंत अपुरी असल्याची धक्कादायक बाब समोर आली, तर दापोलीत बसून प्रांताधिकारी काय करतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़
सुनील तटकरे यांनी तालुक्यातील शाळांचा आढावा घेतला असता गटशिक्षणाधिकारी सांगडे यांनी गेल्या वर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळात १३८ शाळांच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले असून, केवळ ३६ शाळांच्या दुरुस्तीचे अनुदान आल्याची माहिती दिली. त्यावेळी सुनील तटकरे यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना फोन करून तत्काळ निधी पाठवून देण्याचे आदेश दिले.
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ‘तौउते’ चक्रीवादळाचा योग्य आढावा न दिल्याने त्यांना तटकरे यांनी सूचना देऊन तत्काळ शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या, असे सांगितले.