चारचाकीसाठी जागा पुरेना, बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 13:49 IST2021-03-05T13:47:11+5:302021-03-05T13:49:00+5:30
Trafic Ratnagiri-रत्नागिरी शहरात नागरिकांच्या संख्येबरोबरच वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे काहींच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे पार्किंग समस्येबरोबरच अपघातालाही निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे आता शहर वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही चालक अजूनही रस्त्यावरच गाड्या लावून इतरत्र जात आहेत.

चारचाकीसाठी जागा पुरेना, बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण
रत्नागिरी : शहरात नागरिकांच्या संख्येबरोबरच वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे काहींच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे पार्किंग समस्येबरोबरच अपघातालाही निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे आता शहर वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही चालक अजूनही रस्त्यावरच गाड्या लावून इतरत्र जात आहेत.
सध्या प्रत्येक घरात किमान एक दुचाकी असे प्रमाण झाले आहे. काही घरांमध्ये तर प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र दुचाकी वापरते. याचबरोबर आता मध्यमवर्गीय सर्रास चारचाकीचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे काहींच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत.
रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मारूती मंदिर, माळ नाका, राम आळी, गोखले नाका, धनजी नाका या भागात अनेक दुकानांसमोर नो पार्किंगचे फलक समोर लावलेले असतानाही नागरिक आपल्या दुचाकी, चारचाकी गाड्या रस्त्यावरच लावून इतरत्र जातात. त्यामुळे वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण होत असून, यामुळे वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो.
शहरात अनेक भागात नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकासमोर किंवा वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी गाडी लावल्यास शहर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. अशा वाहनचालकांकडून २०० रूपयांच्या दंडाची वसुली केली जाते. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मारूती मंदिर येथे नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नगरपालिकेने सुसज्ज अशी चारचाकी आणि दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने वाहतुकीला शिस्त लागत आहे.
गोखले नाका, धनजी नाका सर्वात त्रासदायक
शहरातील गोखले नाका, धनजी नाका या भागात सकाळी तसेच सायंकाळच्या वेळी वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. बरेचदा सिग्नल यंत्रणा बंद असल्याने एकाच पोलिसाला नियंत्रण करावे लागते. दुपारच्या वेळेत पोलीस नसल्याने मात्र राम आळी, गोखले नाका, धनजी नाका येथे दुचाकींबरोबरच मोठी वाहनेही वाट्टेल तिथे थांबवली जातात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.
कारवाईला प्रारंभ
चालकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. नो पार्किंगचा फलक समोर दिसत असूनही त्याच्यासमोरच गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होण्याबरोबरच काही वेळा अपघात घडतात. त्यामुळे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने आणि त्यांच्या टीमने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई सुरू आहे. गेल्यावर्षी १४,६४६ जणांकडून २९ लाख २८ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.