रत्नागिरी विभागात १२२ कर्मचाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: March 5, 2016 00:03 IST2016-03-04T22:28:27+5:302016-03-05T00:03:45+5:30
एस. टी. महामंडळ : ४७ जणांचे निलंबन, ७५ बडतर्फ

रत्नागिरी विभागात १२२ कर्मचाऱ्यांवर कारवाई
रत्नागिरी : पैशांचा अपहार, प्रवाशांशी उध्दट वर्तन तसेच सततची गैरहजेरी यामुळे वर्षभरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील एकूण १२२ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्याअंतर्गत ३६ वाहक, ११ चालक निलंबित करण्यात आले, तर ७५ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी विभागात एकूण ७५० गाड्यांव्दारे दररोज ९ हजार फेऱ्यांमधून एकूण २ लाख ५० हजार प्रवाशांची वाहतूक होते. दररोज २ लाख ३३ किलोमीटर इतका प्रवास होत असल्याने एस. टी.ला मिळणारे दररोजचे उत्पन्न सरासरी ६१ लाख ९ हजार रुपये इतके आहे.
प्रवाशांची वाहतूक करताना अनेकवेळा प्रवाशांशी उध्दटपणे वाद घालणे, गैरवर्तन करणे, थांब्यावर प्रवासी थांबलेले असताना गाडीत जागा असूनही पुढे नेवून गाडी थांबवणे, प्रवाशांना न घेता गाडी रिकामी घेऊन जाणे आदी विविध कारणांमुळे जिल्ह्यातील एकूण ११ चालकांवर निलंबिनाची कारवाई करण्यात आली आहे. तीन महिन्यांसाठी चालकांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे मंडणगड, दापोली, खेड, राजापूर आगारातील प्रत्येकी एक व रत्नागिरी आगारातील ७ चालक निलंबित करण्यात आले.
तिकीट व पैशांच्या देवाणघेवाणीमुळे झालेल्या अपहारामध्ये जिल्ह्यातील ३६ वाहकांवर कारवाई करण्यात आली. वाहकांनाही ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. मंडणगड ३, दापोली १, खेड ७, चिपळूण ९, गुहागर २, देवरूख २, रत्नागिरी ५, राजापूर ४ व लांजा आगारातील ३ वाहकांचा यात समावेश आहे. सातत्याने कामावर गैरहजर राहून कामाचा खोळंबा करणाऱ्या व प्रशासनाला त्रास देणाऱ्या एकूण ७५ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये चालक ४१, वाहक २४, कार्यशाळा कर्मचारी ५ व प्रशासकीय कर्मचारी ५ यांचा समावेश आहे. वेळोवेळी समज देऊनही कामात व वर्तणुकीत सुधारणा न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून बडतर्फ करण्यात येते. वर्षभरात ७५ कर्मचारी बडतर्फ झाले आहेत. प्रवाशीभिमुख आणि विनम्र सेवा तसेच निर्धोक वाहतूक यासाठी एस. टी. प्रयत्नशील असून या चौकटीत न वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. (प्रतिनिधी)
प्रवासी : सौजन्याने वागायला शिका...
एस. टी.चे अनेक कर्मचारी प्रवाशांशी उध्दटपणे वागतात, हेच यावरून दिसून आले आहे. एकीकडे एस. टी.चे भारमान घटत असताना दुसरीकडे एस. टी. कर्मचाऱ्यांनाही त्याच्याशी काही सोयरसुतक नसल्यानेच महामंडळ तोट्यात चालत असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे.