चिपळुणात बसला अपघात, तीन प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST2021-09-05T04:36:20+5:302021-09-05T04:36:20+5:30
चिपळूण : कासे चिपळूण - स्वारगेट या एस. टी.वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती चौपदरीकरणादरम्यान खोदकाम केलेल्या खड्ड्यात जाऊन कलंडल्याची ...

चिपळुणात बसला अपघात, तीन प्रवासी जखमी
चिपळूण : कासे चिपळूण - स्वारगेट या एस. टी.वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती चौपदरीकरणादरम्यान खोदकाम केलेल्या खड्ड्यात जाऊन कलंडल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता मुंबई - गोवा महामार्गावरील पंचायत समिती परिसरात घडली. यात चारपैकी तीन प्रवासी जखमी झाले असून, त्यात एका महिलेचा समोवश आहे.
सदानंद राजाराम बोरसुतकर (७२, रा. अलोरे), सुषमा धनंजय तावडे (४५, रा. चिपळूण), जयंतीलाल पटेल (५६) अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. पाटण आगाराची ही एस. टी. बस स्वारगेटहून चिपळूण आगारात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आली होती. नोंदणी करुन ही बसगाडी पुन्हा सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास स्वारगेटकडे निघाली. यावेळी या बसमध्ये ४ प्रवासी होते. या गाडीवर चालक म्हणून एम. एस. कदम तर वाहक म्हणून राहुल होगाडे कार्यरत होते. ही बसगाडी आगारातून पुढे पॉवरहाऊस नाकामार्गे मुंबई - गोवा महामार्गावरील पंचायत समिती परिसरात आली असता, गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी चौपदीरकरणादरम्यान खोदकाम केलेल्या एका खड्ड्यात जाऊन वीजखांबाला धडक देत एका बाजूला कलंडली. ही बस दरवाजाकडील बाजूला कलंडल्याने ३ जखमींना बसबाहेर काढणे कठीण होऊन बसले होते. यावेळी बसचालकाला पहिल्यांदा बाहेर काढून त्यानंतर जखमींना काढण्यात आले. या बचावकार्यात टेरव येथील विलास मोहिते यांच्यासह नागरिकांनी सहकार्य केले.