रत्नागिरी : रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर २१ जूनला सकाळी ७:३० ते १०:३० या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. या मेगाब्लाॅकमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.रत्नागिरी ते सिंधुदुर्गातील वैभववाडी या दरम्यान मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. या मेगाब्लाॅक दरम्यान दादर–सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस (गाडी क्र. ११००३) या गाडीचा प्रवास रोहा–रत्नागिरी विभागादरम्यान २:३० तासांसाठी राेखून ठेवण्यात येणार आहे. तसेच दि. २० जूनला सुटणारी तिरुवनंतपूरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) नेत्रावती एक्स्प्रेस (गाडी क्र. १६३४६) उडुपी – कणकवली विभागादरम्यान तीन तासांसाठी थांबवून ठेवण्यात येणार आहे. त्याचबराेबर २१ जूनला सुटणारी सावंतवाडी राेड - दिवा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १०१०६) सावंतवाडी राेड ते कणकवली दरम्यान ३० मिनिटांसाठी राेखून ठेवण्यात येणार आहे.मेगाब्लाॅकच्या कालावधीत काेकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. काेकण रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मेगाब्लाॅक दरम्यान गाड्यांच्या केलेल्या बदलाची नाेंद घ्यावी, असे आवाहन काेकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर उद्या तीन तासांचा मेगाब्लॉक, गाड्यांचे वेळापत्रक बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 13:55 IST