मंडणगड : शाळा सुटल्यानंतर माेबाइल चार्जरच्या कारणावरून घरी बोलावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार मंडणगड तालुक्यात उघडकीला आला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकासह ही फिर्याद राेखण्यासाठी दबाव टाकणाऱ्या अन्य नऊ जणांवर बाणकाेट सागरी पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २३ जुलै राेजी तालुक्यातील एका शाळेतील संशयित शिक्षक नीलेश अशाेक कांबळे यांनी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला शाळेत असलेला चार्जर घेऊन घरी बोलावून घेतले. त्यांनी सोबत आलेल्या दुसऱ्या मुलीला दुकानात साहित्य आणण्यासाठी पाठवले. यानंतर पीडितेला हॉलमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार नातेवाइकांना सांगितला. पालकांनी याप्रकरणी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता गावातील काही जणांनी दबाव आणून तसे न करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.मात्र, तब्बल दीड महिन्यानंतर १९ सप्टेंबर राेजी पालकांनी पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयित शिक्षकावर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७४ तसेच पाेक्साे कायदा २०१२ कलम ८, १२ आणि २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच दबाव टाकल्याप्रकरणी प्रकाश रामजी शिगवण, सुभाष रामजी शिगवण, वैभव पांडुरंग भानसे, पांडुरंग यशवंत शिगवण, रघुनाथ गुणाजी भानसे, शंकर रामजी होडबे, मनोहर जानू जोशी, संदीप यशवंत कांबळे, राकेश साळुंखे या नऊ जणांविरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पाेलिस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.
तक्रार दाखल हाेताच खळबळहा प्रकार घडला त्यावेळी पालकांकडून अशी कोणतीही घटना घडली नसल्याचा लेखी जबाब पाेलिस स्थानकात देण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित पालकांची भेट घेऊन चौकशी केली होती. त्यावेळी पालकांनी कुठलीही तक्रार नसल्याचे जिल्हा परिषद व पोलिस स्थानकात लेखी कळविले होते. मात्र, आता अचानक तक्रार दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.